कर्माचं फळं! ४ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या प्रकरणी एकास जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 04:50 PM2020-12-15T16:50:09+5:302020-12-15T16:51:03+5:30
Rape And Murder : इतर साथीदारांना ४ वर्षांचा कारावास
मीरारोड - अवघ्या ४ वर्षांच्या चिमुरडीचा अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने मुख्य आरोपीस जन्मठेप आणि त्याच्या दोन साथीदारांना ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. भाईंदर पूर्वेच्या आझादनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना जानेवारी २०१७ मध्ये घडली होती.
सोमवार ९ जानेवारी २०१७ रोजीच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास पीडित ४ वर्षांची मुलगी घरा बाहेर खेळत होती. त्याच भागात राहणाऱ्या मोहम्मद युनुस हाजी महंमद बशीर शहा उर्फ झीरो उर्फ झीरु (२४) याने चॉकलेट घेऊन देतो म्हणून मुलीला कडेवर उचलून नेले. चॉकलेट दिल्यावर तीला तो मागील निर्जन नाल्याजवळ घेऊन गेला. तेथे त्याचे परिचीत मोहम्मद रोजान इसहाक राईनी उर्फ लंगडा (३८), जितेंद्र उर्फ जितु तिर्थप्रसाद राव (३२) हे आधी पासूनच होते.
युनुसने तेथेच त्या चिमुरडीवर अमानवी जबरी बलात्कार केला. ती मोठय़ाने रडु लागल्याने युनुसने तीचे तोंड दाबले तसेच तीच्या डोक्यावर कठीण वस्तुने प्रहार केला. यातच तिचा मृत्यू झाला. ती मरण पावल्याचे समजताच नाल्यातच तीचा मृतदेह टाकला. तेथुन जवळच्याच विहरीवर जाऊन त्यांनी हातपाय धूतले व एका हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले. इतके झाल्यानंतर देखील ते पळुन गेले नाहीत. परिसरातच भटकत होते.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या संतापजनक अशा या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. तत्कालीन ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवघरचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे, स्थानिक गुन्हेशाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल वाघ आदींची पोलीस पथकं नेमण्यात आली. सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल वाघ ह्यांच्या पथकाने कसोशीने तपास करून अवघ्या ३६ तासात ह्या तिन्ही आरोपीना अटक केली होती. पोलीस कर्मचारी अविनाश गर्जे व अशोक पाटील वाघ यांच्या पथकात होते.
सर्व आरोपी हे आझाद नगर मागील मैदानातील झोपडय़ात रहायचे. भंगार गोळा करणे, माल वाहणे आदी मिळेल ते काम करायचे. गांजा आदीचे व्यसन त्यांना असुन मुख्य आरोपी युनुसला अश्लील क्लीप पाहण्याचा शौक होता. तो पीडित मुलीच्या वडिलांच्या टॅम्पोत भांगार भरण्याचे काम करायचा. त्यामुळे त्याचे त्यांच्या घरी नेहमीचे येणे जाणे होते. तो नेहमी तिला चॉकलेट देत असे .
सदर गुन्ह्यातील तिघाही आरोपीना भादंवि व पोस्को कायद्या खाली दोषी ठरवत सोमवार १४ डिसेंबर रोजी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी शिक्षा ठोठावली आहे . मुख्य आरोपी युनुस उर्फ झिरो ह्याला जन्मठेपेची शिक्षा आणि ७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर राजन उर्फ लंगडा आणि जितेंद्र उर्फ जितू ह्या दोघांना ४ वर्ष कारावास आणि प्रत्येकी ३ हजार रुपये दंड ची शिक्षा दिली आहे . तपास अधिकारी श्रीकांत पाडुळे तर पैरवी आसवले यांनी केली. मोहोळकर यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.