माजलगाव नगरपरिषदेत दीड कोटींचा अपहार; तत्कालीन मुख्याधिकारी गावीतसह तिघांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:18 PM2019-12-14T12:18:27+5:302019-12-14T13:25:31+5:30
जीवन प्राधिकरण बीड यांच्याकडून घेतलेली तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता यामध्ये तफावत
माजलगाव : येथील नगरपरिषदेत २२ रस्त्यांची व नाल्यांची कामे न करता १ कोटी ६१ लाख १० हजार रुपयांचा अपहार व फसवणूक प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी वी.सी. गावित, लेखापाल अशोक कुलकर्णी-वांगीकर, अभियंता महेश कुलकर्णी या तिघांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येथील नगरपरिषदेस शासनाने ११ जानेवारी २०१७ रोजी न.प.साठी विशेष रस्ता अनुदान अंतर्गत १ कोटी ६१ लाख १०१३० रुपये इतक्या रकमेच्या २२ कामांना मान्यता देण्यात आली होती. न.प.प्रशासन संचालनालय मुंबई यांनी विविध योजना अंतर्गत झालेल्या अपहार संदर्भात ३ मे २०१९ रोजी गठीत केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार व सदरील २२ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण बीड यांच्याकडून घेतलेली तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता यामध्ये तफावत आहे. तसेच मोजमापे यामध्ये तफावत असल्याने फोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश उपसंचालक यांनी आदेशीत केले.
त्यानुसार नगरपरिषद अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड यांनी शहर पोलीस ठाण्यात अपहार व फसवणूकीची फिर्याद दिली. त्यानुसार तत्कालीन मुख्याधिकारी बी सी गावित,( सध्या राहता न.प.येथे मुख्याधिकारी) , लेखापाल अशोक कुलकर्णी-वांगीकर, अभियंता महेश कुलकर्णी यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे