डिजिटल पायरसीद्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्याला बेड्या, हैदराबादमधून केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 11:42 PM2021-07-13T23:42:16+5:302021-07-13T23:42:48+5:30
Cyber Crime News: तांत्रिक पुराव्याच्या आधारे पथकाने व्यंकटेश्वरलु याला हैदराबाद येथून व्यंकटेश्वरलु याला ताब्यात घेतले.
मुंबई : कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करुन डिजिटल पायरसीद्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्याला महाराष्ट्र सायबर विभागाने अटक केली आहे. सतीश व्यंकटेश्वरलु (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर हैद्राबाद येथून ही कारवाई करण्यात आली आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, थोप टिव्हीने मोबाईल स्टँडअलोन प्रा. अँप्लिकेशनच्या माध्यमातून कोणतीही परवानगी न घेता युजर्सना चित्रपट, टीव्ही शो, वेब-मालिका यांचे अवैधरित्या प्रसारण आणि पुनरप्रक्षेपण केले. त्यामुळे नुकसान झाल्याबाबत वायकॉम १८ मीडिया प्रा. ली. आणि अन्य एका ब्रॉडकास्टर कंपनीने राज्य सायबर विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवत सायबर विभागाने तपास सुरू केला.
तांत्रिक पुराव्याच्या आधारे पथकाने व्यंकटेश्वरलु याला हैदराबाद येथून व्यंकटेश्वरलु याला ताब्यात घेतले. त्याने स्टँडअलोन पायरेटेड अँप्लिकेशन तयार करत त्याआधारे इनबिल्ट एपीआय वापरून कंटेंटची चोरी केल्याचे स्पष्ट होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, पोलीस उपमहानिरीक्षक हरिश बैजल, पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे, पोलीस उपअधीक्षक विजय खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अर्चना सुतार, संदीप पाटील, रविकांत भंडारी आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.