नोकरीच्या थापा मारणारा तोतया पोलीस जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:15 AM2019-03-20T02:15:59+5:302019-03-20T02:16:43+5:30
बनावट ओळखपत्र तयार करून पोलिसांचा ड्रेस घालून तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका तोतया पोलीस उपनिरीक्षकास हडपसर पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत.
हडपसर - बनावट ओळखपत्र तयार करून पोलिसांचा ड्रेस घालून तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका तोतया पोलीस उपनिरीक्षकास हडपसर पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : संजय उल्हास शिंदे असे या अटक केलेल्या तोतया पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याचे लग्न झालेले असून तो काळेपडळ येथे राहण्यास आहे. नोकरीच्या आमिषाने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या.
संजय शिंदे असं नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे आणि आपल्या मोठमोठ्या कंपनीत ओळखी असल्याचे सांगत नोकरीचे
आमिष दाखून त्यांच्याकडून पैसे उकळले. तसेच राहणीमान आणि पोलीस उपनिरीक्षकाचे ओळखपत्र यामुळे त्याच्यावर सहज विश्वास ठेवला जात होता. तो आपल्या कारला पोलीस अशी पाटी लावून फिरायचा तसेच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलावत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते.
यावेळी मात्र पोलिसांना त्याच्या गाडीच्या वर्णनाची कार लोणी टोल नाका पार करताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कार थांबवण्याचा इशारा केला. परंतु कार थांबली नाही. ती पुढे मोरेवस्तीकडे गेली. पोलिसांनी पाठलाग करून कार थांबविली. त्यावेळी कारमधील व्यक्ती आपण पीएसआय असल्याचे सांगू लागला. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्र मागितले. त्याने दाखविल्यावर ते बनावट असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी ओळखले. त्यानंतर त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले.
त्याचे शिक्षण १२ वीपर्यंत झालेले आहे. त्याने कोहिनूर ंइन्स्टिट्यूटमधून २०१४ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली. त्याला पोलीस व्हायचे होते. परंतु पोलीस व्हायचे स्वप्न पूर्ण न झाल्याने त्याने विमाननगर येथील इनॉर्बिट मॉलमध्ये नोकरी स्वीकारली. मात्र पैशांची चणचण भासू लागल्याने लोकांना गंडविण्यास सुरुवात केली. त्याने एक पीएसआयचा गणवेश विकत घेऊन तो परिधान करत फोटो काढून बनावट ओळखपत्र तयार केले.
त्यानंतर बेरोजगार तरुणांना नोकरीच्या आमिषाने लुटण्याची शक्कल लढविली. त्याने अशा प्रकारे पुण्यातील व पुण्याबाहेरील अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर सहा महिन्यांपूर्वी तळवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, हमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, चव्हाण, कर्मचारी राजेश नवले, बजरंग धायगुडे, अनिल कुसाळकर, अमित कांबळे, शहिद शेख, ज्ञानेश्वर चित्ते यांच्या पथकाने केली.