ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक; ५ लाखाची एमडी जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:40 PM2023-07-10T23:40:51+5:302023-07-10T23:41:09+5:30
त्याने हे ड्रग्स कुठून आणले याचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलिस करत आहेत.
नवी मुंबई - ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या एकाला वाशीतून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे साडेपाच लाखाची ५२ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. त्याने हे ड्रग्स कुठून आणले याचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलिस करत आहेत.
शहराला अमली पदार्थ मुक्त करण्याच्या उद्देशाने ड्रग्स विक्रेत्यांवर, पुरवठादारांवर कारवाईचे निर्देश पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक पोलिस व गुन्हे शाखा पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत.
यादरम्यान वाशी परिसरात एकजण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी उपनिरीक्षक कुलदीप मोरे, विजय शिंदे, पोलिस नाईक महेश तायडे, पी.एन. कुलकर आदींचे पथक केले होते. त्यांनी रविवारी रात्री वाशी परिसरात सापळा रचला होता. त्यामध्ये एका संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे ५२ ग्रॅम एमडी सदृश्य ड्रग्स आढळून आले.
बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे साडेपाच लाख रुपये आहे. अधिक चौकशीत त्याचे नाव दीपक सुभाष सूर्यवंशी (३७) असून तो तुर्भे सेक्टर २१ मधील राहणारा असल्याचे समोर आले. सोबत असलेले ड्रग्स घेऊन तो वाशीत ठरलेल्या ग्राहकांना पुरवण्यासाठी आला होता. त्याने हे ड्रग्स कोणाकडून घेतले याचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलिस करत आहेत. याप्रकरणी दीपक याच्यावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.