बँकांमध्ये वृद्धांना गंडविणारा वृद्ध अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 05:51 AM2019-09-29T05:51:40+5:302019-09-29T05:51:50+5:30
बँकांमध्ये पैसे मोजून देण्याच्या नावाखाली वृद्धांना टार्गेट करणाऱ्या वृद्धाला गुन्हे शाखेने अटक केली आहे़ रजा मिसा ईराणी (६०) असे आरोपीचे नाव आहे.
मुंबई : बँकांमध्ये पैसे मोजून देण्याच्या नावाखाली वृद्धांना टार्गेट करणाऱ्या वृद्धाला गुन्हे शाखेने अटक केली आहे़ रजा मिसा ईराणी (६०) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अंबिवली येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने ही कारवाई केली आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष ७चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. रजा हा ईराणी टोळीतील आहे. अंबिवलीत तो दोन मुली आणि पत्नीसोबत राहतो. तो २०१० पासून चोरी, फसवणूक करत आहेत. बँकांमध्ये जायचे. तेथे वृद्ध, तसेच अशिक्षितांना गाठायचे. त्यांना नोटा फाटक्या आहेत, तसेच मोजून देण्याच्या नावाखाली हातचलाखीने पैसे काढायचा. अशाप्रकारे त्याने मुंबईत २३ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध भायखळा पोलीस ठाण्यात १ अजामीनपात्र वारंटदेखील प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे़
२३ सप्टेंबर रोजी घाटकोपरच्या अमृतनगर येथे त्याने अशाच प्रकारे एका ज्येष्ठाची पैसे मोजून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत १६ हजार रुपयो लंपास केले होते. तक्रारीनंतर तपासाअंती रजा याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर वरील माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे.