नालासोपारा स्फोटके प्रकरणात बॉम्बचे प्रशिक्षण देणारा अटकेत, एटीएसची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:34 AM2020-01-24T06:34:00+5:302020-01-24T06:34:31+5:30
नालासोपारा स्फोटके प्रकरणातील आरोपींना गावठी बॉम्बचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रताप जुदीष्टर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (३४) याला पश्चिम बंगाल येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
मुंबई : नालासोपारा स्फोटके प्रकरणातील आरोपींना गावठी बॉम्बचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रताप जुदीष्टर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (३४) याला पश्चिम बंगाल येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राज्य दहशतवादविरोधी पथकाने पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील हा तेरावा आरोपी आहे.
नालासोपारा स्फोटके प्रकरणात एटीएसने १० आॅगस्ट २०१९पासून अटकसत्र सुरू करीत नालासोपारा, पुणे, औरंगाबाद, जालना आणि मुंबईतून शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगरकर आणि अविनाश पवार यांच्यासह वासुदेव सूर्यवंशी उर्फ मॅकेनिक (१९), लीलाधर लोधी उर्फ विजय उर्फ लंबू उर्फ भय्या (३२), सुजीथ कुमार उर्फ सुजीथ एस. आर. उर्फ मंजुनाथ उर्फ प्रवीण रंगास्वामी (३७) आणि भारत कुरणे उर्फ अंकल (२७), अमोल काळे उर्फ भाईसाहेब उर्फ संजय भन्सारे (३४), अमित बड्डी उर्फ गोविंदा (२७), गणेश मिसकीन उर्फ मिथुन (२८) अशा एकूण १२ जणांना अटक केली. हिंदूराष्ट्र निर्मितीच्या उद्देशाने एकत्र आलेल्या या तरुणांच्या दहशतवादी टोळीने पिस्तुले, गावठी बॉम्ब तयार करून हिंदू धर्म, रूढी, प्रथा-परंपरा यांना विरोध, विडंबन, लिखाण आणि वक्तव्य करणाºया व्यक्ती आणि कार्यक्रमांना लक्ष्य करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
डिसेंबर २०१७ मध्ये पुण्यात आयोजित सनबर्न फेस्टिव्हलला लक्ष्य करण्यासाठी या टोळीने रेकी करून घातपाताची तयारीही केली होती. मात्र हा कट पूर्णत्वास गेला नाही. टोळीने साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक व्यक्तींना लक्ष्य करून रेकी केल्याचेही एटीएसच्या तपासात उघड झाले होते.
या आरोपींविरुद्ध ५ डिसेंबर २०१९ रोजी दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. आरोपींच्या चौकशीतून हाजराने त्यांना गावठी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली. तसेच पुण्यातील सनबर्न या पाश्चिमात्य संगीत महोत्सवात गावठी बॉम्ब फेकून निषेध नोंदविण्याच्या कटात हाजरा सहभागी होता. त्यानुसार, एटीएस पथक त्याच्या मागावर होते. मात्र गुन्हा दाखल होताच हाजरा फरार झाला.
याच दरम्यान हाजरा पश्चिम बंगालच्या उष्टी जिल्ह्यात असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार, एटीएस प्रमुख देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पश्चिम बंगालला रवाना झाले. तेथे कोलकाता एसटीएफ आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने तपासाअंती सोमवारी त्याला अटक करण्यात आली.
३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
हाजरा याला गुरुवारी मुंबई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हाजरा हा मूळचा पश्चिम बंगालच्या उष्टी जिल्ह्यातील नैनापूरमधील रहिवासी आहे. या प्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.