जीएसटीने जप्त केलेल्या १८ लाख किंमतीच्या ब्रॅण्ड सिगारेटची चोरी, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 16:18 IST2021-02-03T16:13:06+5:302021-02-03T16:18:00+5:30
Crime News :१८ लाखाच्या सिगारेट चोरी प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रणय तिडके नावाच्या इसमाला अटक केली.

जीएसटीने जप्त केलेल्या १८ लाख किंमतीच्या ब्रॅण्ड सिगारेटची चोरी, एकास अटक
उल्हासनगर : जीएसटीच्या अहमदाबाद युनिटने जप्त केलेला १८ लाख २२ हजार रुपये किंमतीचा ब्रॅण्ड सिगारेटची उघोगविहार मधील सीलबंद गाळ्यातून चोरी झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग -१ चे अधिकारी करीत आहेत. विभागाला आतापर्यंत एकाला अटक करण्यात यश आले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील उधोगविहार मधील गाळा नं-२ मध्ये १८ लाख २२ हजार किंमतीचा ब्रॅण्ड सिगारेटचा साठा ९ ते १० मार्च २०१९ दरम्यान डायरेक्टर जनरल ऑफ गुडस् अँण्ड सर्व्हिसेस टॅक्स इंटेलिजन्स झोनल (जीएसटी) युनिट अहमदाबाद यांनी जप्त करून सीलबंद केला. दरम्यान १३ एप्रिल २०१९ रोजी गाळ्यातील जप्त व सीलबंद केलेल्या सिगारेटची चोरी झाल्याचे उघड झाले. गाळा मालक व फिर्यादी जितेंद्र बलदेव माखेजा यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे तक्रार दाखल झाली नसल्याची प्रतिक्रिया ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग -१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या नं-१ च्या युनिटने तपासचक्र सुरू केले.
छोटा राजन टोळीच्या हस्तक खंडणी प्रकरणात ६ वर्ष होता फरार, पुण्यात केली अटक
१८ लाखाच्या सिगारेट चोरी प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रणय तिडके नावाच्या इसमाला अटक केली. त्याला आज न्यायालय समोर उभे केले असता, ६ फेब्रुवारी प्रयत्न पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांनी दिली. सिगारेटच्या चोरीनंतर ८ महिन्यांनी गुन्हा दाखल होऊन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला अटक केली असून यामागचे एका टोळीची शक्यता व्यक्त होत आहे. मालर्वो लाईट स्वीझरलँड, एसेगोल्ड, एसेलाईट व गोल्डफ्लेक्स नावाच्या सिगारेटचा समावेश यामध्ये आहे. जीएसटी अहमदाबाद युनिटने जप्त व सीलबंद केलेल्या गाळ्यातून सिगारेटची चोरी झाल्याने, एकूणच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.