लिंकवर एक क्लिक अन् बँकखाते रिकामे, फिशिंग लिंक्सच्या जाळ्यात अडकू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 11:43 AM2021-08-02T11:43:42+5:302021-08-02T11:44:12+5:30
Cyber Crime: फिशिंग लिंक... ऑनलाइन फ्रॉडचा अगदी सहज सावज हाताला लावून देणारा मार्ग. ऑनलाइन चोर या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
फिशिंग लिंक... ऑनलाइन फ्रॉडचा अगदी सहज सावज हाताला लावून देणारा मार्ग. ऑनलाइन चोर या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. भारतात तर हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. मेसेजमध्ये येणाऱ्या लिंकवर क्लिक करताच, तुमचे पैसे होऊ शकतात लंपास. जाणून घ्या नेमकं फिशिंग लिंक म्हणजे काय, काय असते मोडस ऑपरेंडी आणि कसं त्यापासून आपली कष्टाची कमाई वाचवावी....
काय आहेत मोडस ऑपरेंडी?
या प्रकारात गुन्हेगार एखाद्या संस्थेचे - म्हणजे बँक किंवा
ई-कॉमर्स अथवा सर्च इंजिन - हुबेहुब संकेतस्थळ तयार करतात.
बनावट संकेतस्थळाच्या लिंक्स मग सोशल मीडिया, ई-मेल, एसएमएस किंवा इन्स्टा मेसेंजर यांच्याद्वारे पसरवल्या जातात.
येथेच ग्राहकांची अनेकदा फसगत होते. आलेल्या लिंकच्या यूआरएल तपशिलाची शहानिशा न करता ग्राहक या लिंकवर क्लिक करून आपला पासवर्ड टाकतात.
पासवर्ड टाकला की या बनावट संकेतस्थळाचे निर्माते तो मूळ संकेतस्थळावर टाकून ग्राहकाची फसवणूक करतात.
काय काळजी घ्यावी?
ग्राहकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
तसेच अनोळखी वा फसवे वाटणारे एसएमएस किंवा मेल ओपन न करता तातडीने नष्ट करावेत.
ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहारांसाठी लागणारे पासवर्ड संबंधित बँक वा ई-कॉमर्सच्या संकेतस्थळावर टाकायचे असतील तेव्हा त्या संकेतस्थळाची सत्यता काळजीपूर्वक तपासावी. संशय आल्यास व्यवहार करू नये.