नोकरीचे आमिष दाखवून एक कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:49 AM2020-01-18T06:49:43+5:302020-01-18T06:49:50+5:30
सोळेकर यांनी पैसे तसेच म्हाडातील घराबाबत विचारणा केली. त्यानंतर, घरासाठी लागणाºया कागदपत्रांची मागणी केली. ही कागदपत्रेही त्यांनी दिली. मात्र, तरीही त्यांना घर आणि पैसे परत केले नाही.
ठाणे : मुंबईत रिझर्व्ह बँकेत लिपिकपदाच्या नोकरीचे आमिष दाखवून, तसेच म्हाडाच्या गृहसंकुलामध्ये अल्पदरात घर मिळवून देण्याच्या नावाखाली १६ जणांना एक कोटींचा गंडा घालणाºया प्रशांत बडेकर ऊर्फ अरविंद सोनटक्के (४२, रा. टावरीपाडा, कल्याण, जि. ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील बेबीताई सोळेकर यांना प्रशांतने म्हाडामध्ये ओळख असल्याचे सांगून अल्पदरात घर मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून त्यांच्याकडून साडेतीन लाखांची रक्कम २०१९ मध्ये घेतली होती. प्रशांत हा सातारा जिल्ह्यातील कवठे या त्याच्या मूळगावी यायचा. त्यावेळी त्याला सोळेकर यांनी पैसे तसेच म्हाडातील घराबाबत विचारणा केली. त्यानंतर, घरासाठी लागणाºया कागदपत्रांची मागणी केली. ही कागदपत्रेही त्यांनी दिली. मात्र, तरीही त्यांना घर आणि पैसे परत केले नाही.
अशाच प्रकारे त्याने संदीप साळेकर, पांडुरंग कंक, जगन पवार, मोहन गोळे, गणेश बेलोशे, मारुती शेळके, स्वप्नील रांजणे आदी १६ जणांची ८९ लाख दोन हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सातारा जिल्ह्यातील शिरवळ तसेच नागपूर येथील राणा प्रताप पोलीस ठाणे, अंबड (नाशिक), समतानगर (मुंबई), समर्थ पोलीस ठाणे (पुणे), मावळ (पुणे), नंदुरबार शहर (नंदुरबार), चतु:शृंगी (पुणे) आणि कॅन्टोनमेंट (औरंगाबाद) आदी नऊ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, प्रशांत खडकपाडा येथे येणार असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, संजय शिंदे आणि विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पोपट नाळे, अंकुश भोसले, नितीन ओवळेकर आणि हेमंत महाले यांच्या पथकाने त्याला १७ जानेवारी रोजी अटक केली.
अशी केली फसवणूक
प्रशांत फसवणुकीसाठी वेगवेगळ्या पुस्तकांमधून लोकांचे नंबर मिळवायचा. त्यांना रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून, तसेच मुंबईतील म्हाडा गृहसंकुलामध्ये अल्पदरामध्ये घर घेऊन देतो, असे सांगून फसवणूक करीत असे.