कर्ज देण्याच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:43 PM2020-09-25T23:43:37+5:302020-09-25T23:43:50+5:30
गुन्हा दाखल : शोधासाठी विशेष पथक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दोन कोटींचे कर्ज मिळवून देण्यासाठी दोन नामांकित कंपन्यांच्या नावाखाली एका फार्मास्युटिकल कंपनीच्या उपाध्यक्षाची एक कोटी रुपयांची आॅनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला असून, आरोपींच्या शोधासाठी एका विशेष पथकाची निर्मिती केली आहे.
ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक-२ येथील वसंत विहार भागातील ५१ वर्षीय गृहस्थ हे वागळे इस्टेट येथील एका फार्मास्युटिकल कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. एका इंग्रजी सायं दैनिकात प्रसिद्ध झालेली ‘पारस फायनान्स’ गव्हर्नमेंट अॅप्रूव्हल मार्कशीट, अॅग्रीकल्चर, बिझनेस आणि पर्सनल लोन २४ तासांत मिळेल, अशी जाहिरात त्यांनी वाचली होती. या जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाइलवर त्यांनी संपर्क साधला. हा फोन सुनील चव्हाण या व्यक्तीने घेतला. त्याच्याकडे कर्जाबाबतची चौकशी केली, तेव्हा त्याने आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. त्याने दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर त्यांनी कागदपत्रेही पाठवली. ती पडताळून तुम्हाला दोन कोटींचे कर्ज मंजूर होईल, असे त्यांना भासवले, पण काही शुल्क भरावे लागेल, असेही त्यांना सांगण्यात आले. वेगवेगळ्या शुल्कांच्या नावाखाली या उपाध्यक्षांकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर १४ लाखांची रक्कम घेण्यात आली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढची रक्कम भरली नाही. मात्र, कर्जाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी एका मोठ्या वित्तीय कंपनीच्या मोबाइलवर संपर्क साधला. तिथेही त्यांच्याकडून ८७ लाख ५० हजारांची आॅनलाइन फसवणूक करण्यात आली. या दोन्ही कथित फायनान्स कंपन्यांनी मिळून जुलै ते आॅक्टोबर, २०१९ या कालावधीत त्यांची सुमारे एक कोटी एक लाख ६४ हजारांची फसवणूक केली. त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, चौकशी करून २१ सप्टेंबर, २०२० रोजी दोन वित्तीय कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.