एक कोटीच्या परदेशी सिगारेट जप्त; डीआरएची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 21:47 IST2019-06-11T21:45:20+5:302019-06-11T21:47:03+5:30
चिराबाजारातून एकाला अटक

एक कोटीच्या परदेशी सिगारेट जप्त; डीआरएची कारवाई
मुंबई - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरए) पथकाने काळबादेवी येथील चिरा बाजारमधील एका गोदामात सोमवारी छापा टाकून एक कोटी एक लाख रुपये किंमतीच्या परदेशी बनावटीच्या सिगारेट जप्त केल्या. मणिपूरातून दिल्लीमार्गे ६० बॉक्समधून विविध कंपनीच्या तब्बल ६ लाख ७३ ,१२० सिगारेट तस्करी करुन आणण्यात आल्या होत्या. याप्रकरणी गोदाम मालक बिपीन सिंग (वय ३०) याला अटक करण्यात आली असून त्याला २५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या कारवाईतून परदेशातून सिगारेटची तस्करी करण्याचे रॅकेट उघडीस आले असून सिंग याच्या दिल्लीतील काही साथीदारांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे.
मणिपुरातून सिगारेटची तस्करी करण्यात आली असल्याची माहिती डीआरएच्या पथकाला मिळाली. कार्गो कुरियर कंपनीद्वारे हा माल दिल्लीतून रेल्वेने मुंबईत आणण्यात आला असल्याची माहिती होती. त्यानुसार सहआयुक्त समीर वानखडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून चिराबाजार येथील गोदामवर छापा टाकला. त्यावेळी ६० बॉक्समध्ये बेन्सन अॅण्ड हेडिज, गुडग, ग्रॅम, मालर्बो,५५५, पॅरिस आदी कंपनीच्या सिगारेट होत्या. गोदामाचा मालकाला न्यायालयात हजर केले असता त्याला २५ जूनपर्यत न्यायालयीन कोठडी मिळाली. परदेशी सिगारेटीच्या तस्करीमध्ये दिल्लीतील टोळी सक्रीय असून बिपीन सिंग याच्या सहकाऱ्यांचा शोध सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.