तीन हजारांच्या लाचप्रकरणी तिघांना एक दिवसाची काेठडी
By राजकुमार जोंधळे | Published: October 13, 2023 11:13 PM2023-10-13T23:13:53+5:302023-10-13T23:14:03+5:30
पुणे-लातूर एसीबीच्या पथकाची कारवाई
राजकुमार जाेंधळे, लातूर: तीन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लातूर येथील उपप्रादेशिक परिवहन विभागातील एका अधिकाऱ्यासह अन्य दाेघांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. याबाबत त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे. ही कारवाई पुणे आणि लातूर येथील एसीबीच्या पथकाने संयुक्तपणे केली आहे.
लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारदारांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांची ‘ना वापर’ प्रकारात असलेली एक ट्रॅव्हल्स ‘वापर’ प्रकरणात आणून त्यावरचा टॅक्स वाढविण्यासाठी लातूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भाेये यांनी प्रारंभी पाच हजारांची लाच मागितली. तडजाेडीअंती कार्यालयातील लिपिक प्रमाेद उत्तम साेनसाळी याने तीन हजारांची लाच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी एजंट जिलानी महेबूब शेख (रा. इंडिया नगर, लातूर) याने प्राेत्साहन दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी तिघांनाही एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून, याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात शुक्रवारी गुरनं. ६१५ / २०२३ कलम ७, ७ अ, १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना शुक्रवारी लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे.