किरकोळ वादातील मारहाणीत तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:10 AM2020-01-24T06:10:51+5:302020-01-24T06:11:12+5:30
खारघरमध्ये किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. जितेश ठाकूर (२८) असे तरुणाचे नाव आहे.
पनवेल : खारघरमध्ये किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. जितेश ठाकूर (२८) असे तरुणाचे नाव आहे. तो खारघर शहरातील मुर्बी गावातील रहिवासी आहे. या प्रकरणी सुमित केंदळे (३४)विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ जानेवारीला जितेशने भाऊ छत्रपतीला फोन करून विश्वजीत शाळेजवळ एका तरुणाने त्याला मारहाण केल्याची माहिती दिली. छत्रपतीने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा जितेश दुचाकीजवळ भोला या कामगारासोबत उभा असल्याचे दिसले. छत्रपतीने मारहाणीबाबत विचारल्यावर दुचाकी उभ्या करण्याच्या वादातून सुमितने मारहाण केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर छत्रपतीने जितेशला खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेले. त्यानंतर दोघे घरी गेले. दरम्यान, १७ जानेवारी रोजी जितेशची तब्येत खालावल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याचा एमआरआय केला असता, मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे सांगून डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. शस्त्रक्रिया झाल्यावर जितेशची तब्येत आणखीन खालावली. उपचारादरम्यान जितेशचा २३ जानेवारी रोजी मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी सुमित केंदळे याच्यावर खारघर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.