दिवाळीला घरी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; एकाच घरातील ५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 11:44 AM2022-10-24T11:44:41+5:302022-10-24T11:46:23+5:30
या अपघातात AE विनोद कुमार, त्यांची आई, पत्नी, मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
बस्ती - शहरात भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त होत आहे. वेगानं आलेल्या कारनं हायवेवर उभ्या असणाऱ्या कंटेनरला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती ज्यामुळे कार पूर्णत: कंटेनरमध्ये घुसली. या दुर्घटनेत पती-पत्नी, आई-मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. तर जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये नेताना त्याने वाटेतच जीव सोडला. मुंडेरवा हद्दीत ही घटना घडली.
विनोद कुमार हे प्रयागराजमधील जल निगममध्ये AE म्हणून तैनात होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब लखनौमध्ये राहत होते. रविवारी विनोद कुमार (४२) हे त्यांची आई सरस्वती, पत्नी नीलम (३४), मुलगी श्रेया आणि मुलगा यथार्थ यांच्यासह संत कबीरनगर येथे दिवाळी साजरी करण्यासाठी कारने जात होते. ते मूळचे खलीलाबाद परिसरातील हरपूर धोडही येथील रहिवासी होते. ब्रेझा कारमधील संपूर्ण कुटुंब लखनौहून निघाले होते.
रात्री महामार्गाच्या कडेला कंटेनर उभा होता. विनोद कुमार यांची कार वेगात होती. रात्री आठ वाजता अंधारात अंदाज न आल्याने पाठीमागून कार कंटेनरमध्ये घुसली. सर्वजण गाडीत अडकले होते यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते. अपघातानंतर स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अनेक अडथळ्यानंतर कार गॅस कटरने कापल्याने सर्वांची सुटका झाली. क्रेनच्या सहाय्याने गाडी कंटेनरमधून बाहेर काढण्यात आली.
या अपघातात AE विनोद कुमार, त्यांची आई, पत्नी, मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. एसपी आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले की, पाच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मृताच्या जवळच्या आणि नातेवाईकांना माहिती देण्यात आली.
बरेच दिवस हे कुटुंब गावी गेले नाही
विनोद कुमार हे कुटुंबासह लखनौमध्ये राहत होते. त्यांचा मुलगा आणि मुलगी लखनौमध्येच शिकत असत. बरेच दिवस होऊनही ते गावी आले नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे यावेळी दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जात होते. अपघात झाला तेथून त्याच्या घराचे अंतर फक्त १७ किलोमीटर होते. या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा क्षणार्धात मृत्यू झाला. आता कुटुंबात कोणीही उरले नाही. विनोदच्या वडिलांचे यापूर्वी निधन झाले होते.
रस्त्याच्या कडेला उभा होता कंटेनर
विनोद यांची कार मागून ज्या कंटेनरमध्ये घुसली होती तो कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा होता. कारचे नियंत्रण सुटले आणि कंटेनरच्या मागील बाजूस धडकली आणि स्फोट झाला. लोकांच्या मनात प्रश्न नक्कीच निर्माण होत आहे की, कार रस्त्यावरून खाली येऊन कंटेनरमध्ये घुसली कशी? समोरून कोणते वाहन किंवा प्राणी येत होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.