सावकाराच्या त्रासाला कंटाळून बारामतीत एका शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 07:38 PM2019-04-08T19:38:44+5:302019-04-08T19:39:38+5:30
तू माझे ३ लाख रुपये व्याजाने घेतलेले आहेत, ते परत कधी करणार, आमचे फोन का घेत नाहीत, असे म्हणून संजय यास आरोपींनी शिवीगाळ केली.
बारामती : सावकाराच्या त्रासाला कंटाळून बारामती शहरातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ७) घडली आहे. याप्रकरणी दोघा अज्ञातांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. संजय भानुदास शिंदे (वय ५०, रा. सावंत विश्व बिल्डिंग, तांदूळवाडी रोड, बारामती) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या पत्नी मनीषा संजय शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कल्पना दिलीप जगताप (वय ४२, धंदा खासगी नोकरी, रा. बाबुर्डी, ता. बारामती), सूरज दिलीप जगताप (वय २३, धंदा शिक्षण, रा. बाबुर्डी), नीलेश दिलीप जगताप (वय २५, धंदा कपड्याचे दुकान, रा. बाबुर्डी, ता. बारामती), रोहिणी ऊर्फ रेणुका सुनील गोरे (रा. दुर्गा थिएटरजवळ, बारामती), दीपक जगताप (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही.) या चार जणांना याप्रकरणी अटक केली आहे. अटक आरोपी आणि दीपक जगताप, अंबादास पाडळे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही.), अंबादास पाडळे या दोघांसह अन्य दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी जगताप, पाडळे फरारी आहेत.
तू माझे ३ लाख रुपये व्याजाने घेतलेले आहेत, ते परत कधी करणार, आमचे फोन का घेत नाहीत, असे म्हणून संजय यास आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन व्याजासह पैसे परत दे, नाही तर घरातून उचलून नेऊन पैसे वसूल करू, असा दम दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी मानसिक त्रास देत शिंदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. आर. गंपले अधिक तपास करीत आहेत.
........
बारामती शहरात सावकारी त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. फेब्रुवारीत कसबा येथील शुभम बनकर या तरुणाने सावकारांच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली होती. तसेच, सुपे येथील सावकाराविरोधात याच आठवड्यात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.