बाेगस ५६ सीम कार्डप्रकरणी एकाला चार दिवसांची पाेलिस काेठडी
By राजकुमार जोंधळे | Published: July 29, 2023 09:41 PM2023-07-29T21:41:47+5:302023-07-29T21:42:54+5:30
पाेलिसांची कारवाई; बनावट आधार कार्ड, फाेटाेचा वापर
राजकुमार जाेंधळे, लातूर: बनावट आधार कार्डच्या माध्यमातून ५६ माेबाईल सीमकार्डची विक्री करणाऱ्या उदगीरातील एकाला लातूरच्या दहशतवाद विराेधी शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याला शनिवारी उदगीर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, महाराष्ट्र सायबर कार्यालय, मुंबईने बनावट सीमकार्ड विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई करण्याचे आदेश दिले हाेते. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून बनावट कागदत्राच्या आधारे माेबाईल सीमकार्ड विक्री करणाऱ्यांचा शाेध घेतला जात हाेता. मिळालेल्या माहितीच्या आधारे उदगीरातील एका संशयिताला लातूरच्या दहशतवादविराेध पथकाने ताब्यात घेतले. अधिक चाैकशी करत झाडाझडती घेतली असता त्याने ५६ पेक्षा अधिक सीमकार्डची विक्री केल्याचे समाेर आले. यासाठी त्याने बनावट आधार कार्डचा वापर केला आहे. शिवकुमार महादेव आंबेसंगे (२७, रा. चौबारा रोड, उदगीर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत उदगीर शहर पाेलिस ठाण्यात पोउपनि. आयुब शेख यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल केला आहे. त्याला उदगीरच्या न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. तपास पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम करत आहेत.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. आयुब शेख, सहायक फौजदार उत्तम जाधव, अंगद कोतवाड, अमलदार युसुफ शेख, पोउपनि. मुंडे यांच्या पथकाने केली आहे.
एकाच्याच नावाने केली अनेक सीमकार्डची विक्री
मोबाईल टेलिकॉम कंपन्यांकडून सीमकार्डची विक्री अधिक व्हावी, यासाठी ग्राहकांना विविध प्रलोभने दाखविली जातात. अटकेतील विक्रेत्याने ग्राहकांच्या आधारकार्ड, फोटोंचा गैरवापर करून एकाच्याच नावाने अनेक सीमकार्डची विक्री केल्याचे दाखवत कंपन्यांची फसवणूक केली. शिवाय, बनावट कागदपत्रांद्वारे ॲक्टिव्हेट केलेले सीमकार्ड अनोळखी व्यक्तींना ज्यादा पैशामध्ये विक्री केल्याचे समाेर आले आहे.