करणीच्या संशयातून एकाचा खून, महिला गंभीर जखमी, हल्लेखोर स्वत:हून पोलिस ठाण्यात
By उद्धव गोडसे | Published: May 16, 2023 11:34 PM2023-05-16T23:34:39+5:302023-05-16T23:36:30+5:30
टेंबलाईनाका उड्डाणपूल चौकातील प्रकार, घटनेने खळबळ
उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: आपल्या कुटुंबावर करणी करीत असल्याच्या संशयातून निखिल रवींद्र गवळी (वय २२, रा. टेंबलाईनाका उड्डाणपूल, कोल्हापूर) याने शेजारी राहणा-या कुटुंबावर घरात घुसून तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आझाद मकबूल मुलतानी (वय ४८) हे जागीच ठार झाले, तर त्यांची सून अफसाना आसिफ मुलतानी (वय २२, दोघे रा. टेंबलाईनाका उड्डाणपूल) गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. १६) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोर गवळी स्वत:हून राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला.
घटनास्थळ आणि पोलिस अधिका-यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रिंग कामगार आझाद मुलतानी हे त्यांची पत्नी, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे यांच्यासह टेंबलाईनाका उड्डाणपूल येथील झोपडपट्टीत राहत होते. त्यांच्याच घराच्या शेजारी राहणारा निखिल गवळी हा टेम्पोचालक आहे. मद्यपी आणि गांजाचा व्यसनी निखिल हा नेहमी गल्लीतील लोकांना शिवीगाळ करतो. त्यामुळे तो गल्लीत येताच लोक घराचे दरवाजे बंद करून घेतात. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तो घरात आला. काही वेळाने बाहेर येऊन त्याने आझाद मुलतानी यांच्या घराचे दार उघडे असल्याचे पाहिले. त्यानंतर घरातील तलवार घेऊन त्याने जेवणाच्या ताटावर बसलेले आझाद यांच्यावर पाठीमागून हल्ला चढवला. मानेवर, पाठीत, छातीवर, पायावर आठ ते दहा वार केले. यावेळी सास-यांना वाचवण्यासाठी आलेली सून अफसाना गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर हल्लेखोर निखिल रक्ताने माखलेली तलवार घेऊन पळाला. अंधारात तलवार टाकून तो राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. शेजारचे कुटुंब आपल्यावर करणी करीत असल्याच्या संशयातून हल्ला केल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली. दरम्यान, आझाद मकबूल यांच्या भाच्यांनी दोन्ही जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच आझाद यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तर अफसाना यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.
हल्लेखोराची परिसरात दहशत
हल्लेखोर निखिल याला गांजाचे व्यसन आहे. तो नेहमी गल्लीतील लोकांनी शिवीगाळ करतो. किरकोळ कारणांवरून वाद घालतो. यामुळे परिसरात त्याची दहशत होती, अशी माहिती शेजारच्या महिलांनी दिली. घटनेनंतर हल्लेखोराचे आई, वडील आणि बहीण घाबरून घरातून निघून गेले. परिसरात प्रचंड तणावाची स्थिती होती.