बाटलीमध्ये जमा झालेल्या गॅसच्या स्फोटात एकाचा मृत्यू; गोदाम मालकाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 05:55 AM2021-03-23T05:55:58+5:302021-03-23T05:56:07+5:30
शिळफाटा परिसरात भंगारसदृष्य वस्तू जमा करुन ठेवण्याची अनधिकृत गोदामे मोठ्या प्रमाणावर आहेत.
कुमार बडदे
मुंब्रा : भंगारच्या दुकानातील वस्तू पिकअप वाहनामध्ये भरताना झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याचा तसेच दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी मुंब्राजवळील शीळफाटा परिसरात घडली. या घटनेत बाटलीच्या काचा लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सोहेल खान (वय २४) याचा मृत्यू झाला, येथील एका भंगारच्या गोदामामध्ये जमा करुन ठेवलेल्या विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तू, तसेच बाटल्या दुसरीकडे नेण्यासाठी पिकअपमध्ये भरण्यात येत होत्या. त्यावेळी रसायन असलेल्या एका बाटलीमध्ये जमा झालेल्या गॅसचा स्फोट झाला. तर जहीद खान आणि रोशन शर्मा हे दोघे जखमी झाले. उपचारासाठी त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गोदाम मालकाविरोधात शीळ - डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.
अग्निशमन दलाला घटनेबद्दल माहितीच नाही
शिळफाटा परिसरात भंगारसदृष्य वस्तू जमा करुन ठेवण्याची अनधिकृत गोदामे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामध्ये कागद, प्लॅस्टिक, पुठ्ठे, बाटल्या आदी टाकाऊ वस्तू जमा करुन ठेवल्या जातात. या गोदामांच्या, तसेच तेथील कामगारांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याची येथील गोदामांना वेळोवेळी लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये आढळून आले आहे. विशेष म्हणजे रविवारी झालेल्या दुर्घटनेबाबतची कुठलीही माहिती शिळ अग्निशमन दलातील जवानांना नसल्याचे आढळून आले.