उमंग अॅपद्वारे सफाई कर्मचाऱ्याला एक लाखाचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 09:43 PM2019-10-06T21:43:30+5:302019-10-06T21:45:27+5:30
मामाच्या खात्यात वळते करणाऱ्या मोबाईल रिचार्ज दुकानातील कर्मचाऱ्यास भाईंदर पोलीसांनी अटक केली आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील एका कंत्राटी कामगाराच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन त्याच्या खात्यातील भविष्य निर्वाह निधीचे १ लाख ८ हजार रुपये आधार लिंक जोडुन उमंग अॅपद्वारे परस्पर आपल्या मामाच्या खात्यात वळते करणाऱ्या मोबाईल रिचार्ज दुकानातील कर्मचाऱ्यास भाईंदर पोलीसांनी अटक केली आहे.
कंत्राटी सफाई कामगार रवींद्र पाटील हे मोबाईलचा रिचार्ज करण्यासाठी एका दुकानात जात असत. नंबर बंद झाल्याने त्या दुकानातील रामरतन खुशीलाल मंडल (२३) याने पाटील यांना आधार क्रमांक लिंक करावा लागेल असे सांगून आधार ओळखपत्र मिळवले. मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करुन येतो सांगून आधारकार्डचा उमंग अॅपद्वारे वापर करुन पाटील यांच्या खात्यातील १ लाख ८ हजाराची रक्कम नालतग निरज मंडल याच्या खात्यात वळती केली. पाटील यांनी पैसे कुठे गेले याची माहिती घेतली असता ते काते मंडलचे असल्याचे समजल्यावर त्याने रामरतन यास पोलीसात तक्रार करण्याचे सांगीतले. त्यावर पैसे देतो सांगुन देखील रामरतन ते देत नव्हता. अखेर श्रमजीवी कामगार संघटनेकडे पाटील यांनी फिर्याद केल्यावर पदाधिकाऱ्यांनी भाईंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत जाधव यांची भेट घेतली. पोलीसांनी पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करुन घेत तातडीने हालचाली करुन रामरतन व निरज मंडल यांना अटक केली.