पोलिसांची तीन तरुणांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू; 6 पोलिस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:24 AM2021-09-29T10:24:01+5:302021-09-29T10:25:03+5:30
बाहेर गावावरुन आलेल्या तरुणांकडून खंडनी वसुल करण्यासाठी मारहाण केल्याचा पोलिसांवर आरोप.
गोरखपूर: हॉटेलमध्ये छापेमारीदरम्यान पोलिसांनी तरुणांना केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हॉटेलमध्ये थांबलेल्या तीन तरुणांकडून खंडणी वसुल करण्यासाठी त्यांच्या खोलीत छापेमारी केल्याचा गोरखपूर पोलिसांवर आरोप आहे. या घटनेनंतर या प्रकरणातील आरोप असलेल्या 6 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. मृत तरुणाची पत्नीने पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष, प्रदीप आणि अरविंद हे तीन तरुण गोरखपूरला आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी आले होते. सोमवारी सकाळी 8 वाजता रामगढ ताल परिसरातील कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये ते थांबले. सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास अचानक काही पोलीस त्यांच्या खोलीत पोहोचले आणि त्यांची आयडी तपासल्यानंतर त्याच्या सामानाची शोधाशोध करू लागले.
Gorakhpur Police: Six policemen suspended for negligence during a raid at a hotel room, in which a man was injured. He was later hospitalised but succumbed to injuries.
— ANI UP (@ANINewsUP) September 29, 2021
"Six police personnel have been suspended, matter to be probed by SP North," said SSP Vipin Tada (29.09) pic.twitter.com/7F6G3Nhun9
खोलीत घुसून तरुणांना मारहाण
यावेळी तरुणांनी पोलिसांना या छापेमारीचे कारण विचारले असता पोलिसांनी अरविंद नावाच्या तरुणाला मारहाण करत खोलीबाहेर ओढले. अरविंदने सांगितल्यानुसार, जेव्हा तो खोलीबाहेर उभा होता, तेव्हा त्याने खोलीच्या आतून मनीषला मारहाण केल्याचा आवाज ऐकला आणि पोलिस त्याला बाहेर आणत असल्याचे पाहिले. मनीषच्या चेहऱ्यातून खूप रक्तस्त्राव होतं होता. यानंतर पोलिसांनी त्याला त्यांच्या कारमध्ये बसवले आणि रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांवर वसुलीचा आरोप
गोरखपूरचे रहिवासी राणा प्रताप चंद उर्फ चंदन सैनी यांनी सांगितले की, तिघे त्याचे मित्र आहेत आणि त्याला भेटण्यसाठी गोरखपूरला आले होते. पण, तरुण बाहेर गावावरुन आल्याचे कळताच पोलिसांनी त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी त्यांना खोलीत घुसून मारहाण केली, असा आरोप पोलिसांवर आहे. दरम्यान, मनीष गुप्ताच्या पत्नीने त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच कानपूरहून गोरखपूर गाठले. आता पोलिसांवर खुनाचा खटला चालवण्याची मागणी मनीषच्या कुटुंबियांकडून होत आहे.