पॅरोलवर सुटल्यानंतर चार वर्षे फरार आरोपीस अटक, गुन्हे शाखेची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 01:22 AM2019-08-11T01:22:48+5:302019-08-11T01:23:33+5:30
खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर बाहेर आल्यानंतर तब्बल चार वर्षे फरार असलेला आरोपी रमेश नामदेव नाईकवाडे (३८) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे युनिट एकच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील येवला येथून शनिवारी सकाळी अटक केली.
ठाणे : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर बाहेर आल्यानंतर तब्बल चार वर्षे फरार असलेला आरोपी रमेश नामदेव नाईकवाडे (३८) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे युनिट एकच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील येवला येथून शनिवारी सकाळी अटक केली. तसेच त्याला नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिक ग्रामीण क्षेत्रातील येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत खून आणि अनुसूचित जातीजमाती कायदा कलम ३ प्रमाणे १७ मे २०१३ प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात आरोपी रमेश नामदेव नाईकवाडे, रा.पाटोदा, ता. येवला, जि. नाशिक हा नाशिक रोड कारागृहात शिक्षा भोगत होता.
तो २७ जून २०१५ रोजी अभिवचन रजेवर आला असता, तो ती भोगून हजर होणे आवश्यक असताना २६ सप्टेंबर २०१५ रोजी पासून फरार झाला होता. तो फरार झाल्याबाबत त्याच्याविरु द्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा घटक १ ठाणेचे पोलीस नाईक किशोर भामरे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रमेश याला १० आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजता त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
आरोपीस केले नाशिक पोलिसांच्या हवाली
अटक केलेल्या आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी त्याला नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस हवालदार आनंद भिलारे, सुभाष मोरे, शिवाजी गायकवाड, पोलीस नाईक किशोर भामरे, दादासाहेब पाटील, पोलीस शिपाई राहुल पवार या पथकाने केली.