दारू पिण्याच्या वादावरून एकाची हत्या; आरोपीला सोलापूरमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 10:15 PM2019-07-22T22:15:08+5:302019-07-22T22:16:42+5:30
नशेत झालेल्या वादातून आरोपीने ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
मुंबई - दादर येथील टिळक ब्रीज खाली दारू पिताना झालेल्या वादात एकाने दुसऱ्याची हत्या केली होती. अखेर एका महिन्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्यात माटुंगा पोलिसांना यश आले आहे. विरभद्रा हिरेमठ (२३) याला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. नशेत झालेल्या वादातून आरोपीने ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
मूळचा सोलापूरचा रहिवाशी असलेला हिरेमठ हा दादर स्थानकावर हमालीचे काम करतो. २६ जून रोजी हिरेमठ हा मृत उकेश इंगळे याच्यासोबत मद्यपान करण्यासाठी बसला होता. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यावेळी नशेत उकेशला विरभद्राने गंभीर मारहाण करत त्याच्या गळ्यावर चाकूने गंभीर वार करून पळ काढला. स्थानिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उकेशला पोलिसांच्या मदतीने वेळीच रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे उकेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली. आरोपीबाबत फारशी माहिती नसताना पोलिसांनी परिसरातील ६० ठिकाणावरील सीसीटीव्ही आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर हमाल हिरेमठ हा हत्येच्या दिवसांपासून फरार असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढला. दरम्यान सोलापूरहून हिरेमठला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबूली दिली.