कोयत्याचा धाक दाखवून मध्यरात्री ट्रकचालकाला लुटणाऱ्या एकाला अटक ; मुंबई- पुणे महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:57 PM2020-08-10T12:57:24+5:302020-08-10T12:58:43+5:30
चोरटयांनी ट्रक अडवून कोयत्याचा धाक दाखवत ४ हजार दोनशे वीस रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला.
धायरी: मुंबई - बंगळुरू महामार्गावर पुणे येथील वडगांव बुद्रुक येथील उड्डाणपुलावर मध्यरात्री ट्रकचालकास कोयत्याचा धाक दाखवून ऐवज लुटणाऱ्या चोरट्यास रात्रीच्या वेळीस गस्त घालणाऱ्या सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत ट्रकचालक मनजीत बच्चालाल साह (वय ३५, औरंगाबाद , मूळ .उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. उमेश रमेश जगधने (वय :३०, पापळवस्ती, गणपतनगर, बिबवेवाडी गावठाण, पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
ट्रकचालक मनजीत साह हे (एमएच-१५. ईजी.७५९६) क्रमांकाची ट्रकमध्ये माल घेऊन मुंबईला निघाले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वडगांव उड्डाणपुलावर आल्यानंतर मोटारसायकलवर आलेल्या चार चोरटयांनी ट्रक अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील सोन्याचे लॉकेट, रोख रक्कम असा एकूण ४ हजार दोनशे वीस रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतला. दरम्यान स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर तेथून जात असताना त्यांना सदर प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ सिंहगड रस्ता पोलिसांशी संपर्क साधला. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक इसम महामार्गावर संशयितरित्या मोटारसायकलवरून जात होता. त्या इसमास पोलिसांनी हटकले असता तो पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी त्यास पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ लोखंडी कोयता, एक मोटारसायकल तसेच ट्रकचालकाचा लुटलेला एकूण ४ हजार दोनशे वीस रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे इतर तीन साथीदार पळून गेले असून सिंहगड रस्ता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद महांगडे करीत आहेत.
--