तरुणाच्या खून प्रकरणात एकाला जन्मठेप; १४ साक्षीदारांची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 09:40 PM2021-12-08T21:40:35+5:302021-12-08T21:41:38+5:30
Crime News : खून प्रकरणात कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत (वय २५,रा.मेहरुण, मुळ रा.तेसाही ता.खागा, जि.फतेहपूर, उ.प्र.) याला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जळगाव : मेहरुणमधील मंगलपुरी भागात आसाराम छोटेलाल पवार (वय ३०, मुळ रा.कुंडीया, ता.हरसूद, जि.खंडवा, मध्य प्रदेश) याच्या खून प्रकरणात कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत (वय २५,रा.मेहरुण, मुळ रा.तेसाही ता.खागा, जि.फतेहपूर, उ.प्र.) याला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ६ फेब्रुवारी २०११ रोजी मेहरुणमधील मंगलपुरी भागात सुरेश बंजारा याचे काही लोकांशी भांडण चालू असताना आसाराम पवार हा भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत होता. बंजारा याचा जावई कल्लूसिंग राजपूत याने चाकूने आसाराम याच्यावर वार केले होते. गंभीर जखमी झालेल्या आसाराम याचा उपचार सुरु असताना ११ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यापूर्वीच कल्लूसिंग व त्याचा भाऊ जितेंद्रसिंग याला अटक झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल ३०७ च्या गुन्ह्यात ३०२ चे कलम वाढविण्यात आले होते. तपासाधिकारी बी.ए.कदम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज झाले. यात सरकारपक्षातर्फे ॲड.प्रदीप महाजन यांनी १४ साक्षीदार तपासले. त्यात मृताची पत्नी, भाऊ, आरोपीचे सासू, सासरे यांच्यासह मृत्यूपूर्व जबाब नोंदविणारे कार्यकारी दंडाधिकारी पुरुषोत्तम खैरनार, डॉ.किरण पाटील, डॉ.उमेश वानखेडे व तपासाधिकारी कदम यांचा समावेश आहे. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्याअंती न्यायालयाने कल्लूसिंग याला जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली तर जितेंद्र सिंग यास निर्दोष मुक्त केले. सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता प्रदीप एम.महाजन यांनी प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी राजेंद्र सैंदाणे यांनीही यात मदत केली.