एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या स्कूटरला आग लावली; ती वाचली, पण सात जणांनी प्राण गमावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 08:06 AM2022-05-08T08:06:30+5:302022-05-08T08:07:51+5:30
रात्री या भागातील वीज गेली होती. वीज आल्यानंतर आग लागली. एमसीबी बाॅक्समध्ये पहिल्यांदा आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज होता. नंतर मात्र हा घातपात असल्याचा संशय आहे.
इंदूर : शहरातील दोन मजली इमारतीत शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत सातजण मृत्युमुखी पडले असून, आठजण गंभीररीत्या भाजले आहेत. मृतांमध्ये सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये आधी आग लागली. तेथून ती इमारतीत पसरली. त्यात काहीजण जिवंत जाळले गेले, तर काहीजण गुदमरले. पळण्यास जागा नसल्यामुळे लोकांनी गॅलरीतून उड्या मारल्या. त्यात काहीजण जखमी झाले. या अग्निकांडामागे एकतर्फी प्रेमाचा अँगल समोर आला आहे.
रात्री या भागातील वीज गेली होती. वीज आल्यानंतर आग लागली. एमसीबी बाॅक्समध्ये पहिल्यांदा आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज होता. नंतर मात्र हा घातपात असल्याचा संशय आहे. अग्निशामक दलाचे बंब उशिरा आल्यामुळे हानी जास्त झाली, असे स्थानिकांनी सांगितले.
मृतांमध्ये ईश्वरसिंह सिसोदिया (वय ४५) त्यांची पत्नी नीतू सिसोदिया (४५), आशिष (३०), गौरव (३८) आणि आकांक्षा अग्रवाल (२५) यांचा समावेश आहे. आणखी दोनजणांची ओळख पटू शकलेली नाही.
युवकाने लावली आग
या इमारतीचे मालक इन्साफ पटेल यांच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शुक्रवारी रात्री २.५४ वाजता एक युवक पार्किंगमध्ये येताना दिसतो. तो एका वाहनातून पेट्रोल काढतो, आग लावून निघून जातो, असे दिसत आहे. इमारतीतील सीसीटीव्ही मात्र पूर्णत: जळून खाक झाला आहे. हा तरुण शुभम दीक्षित उर्फ संजय (27) आहे. तो या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्याला त्याच इमारतीतील एका तरुणीशी लग्न करायचे होते, परंतू तिचे दुसरीकडे लग्न ठरविण्यात आले. याचबरोबर काही दिवसांपूर्वी या तरुणाचे त्या मुलीशी पैशांवरून भांडण झाले होते. त्याने आग लागली तेव्हा ती तरुणी त्याच इमारतीत होती, परंतू ती सुखरुप आहे, असे पोलिसांनी सांगितले.