लातूरमध्ये खोटा धनादेश दिल्या प्रकरणी एकास सहा महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:02 PM2018-08-24T18:02:42+5:302018-08-24T18:03:11+5:30
खोटा धनादेश दिल्याप्रकरणी एकास सहा महिने सश्रम कारावास व नुकसान भरपाईपोटी ६० हजार रूपये न दिल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा लातूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.सी.शेख यांनी सुनावली आहे़
लातूर : खोटा धनादेश दिल्याप्रकरणी एकास सहा महिने सश्रम कारावास व नुकसान भरपाईपोटी ६० हजार रूपये न दिल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा लातूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.सी.शेख यांनी सुनावली आहे़
लातूर शहरातील इस्माईल दस्तगीर पठाण (रा़ जिनत सोसायटी)यांनी फिर्यादी नसीमाबेगम इब्राहिमसाब शेख (रा़ काझी मोहल्ला) यांच्याकडून हात उसने तीन लाख रूपये सहा महिन्यांच्या मुदतीसाठी घेतले होते़ मुदत संपल्यावर नसीमाबेगम यांनी पैशाची मागणी केली असता इस्माईल पठाण यांनी लातूर अर्बन को- आॅप बँकेचा धनादेश फियादीच्या नावे दिला़ मात्र, सदरील खात्यात रक्कम नसल्याने चेक वटला नाही़ त्यामुळे खोटा धनादेश देऊन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नसीमाबेगम शेख यांनी अॅड़ एऩ जी़ पटेल यांच्यामार्फत नोटीस दिली़.
या नोटिसीला पठाण यांनी खोटे उत्तर पाठविले़ त्यामुळे पठाण यांच्यावर न्यायालयात फौजदारी दाखल करण्यात आली़ सदर प्रकरणात फिर्यादी व आरोपीची साक्ष,दोन्ही बाजुंच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले़ दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम़ सी़ शेख यांनी फिर्यादीचा युक्तीवाद ग्राह्य धरून इस्माईल दस्तगीर पठाण (वय ३६, रा़ झिनत सोसायटी) यांना कलम १३८ नि़ई़ अॅक्टप्रमाणे सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली़ फिर्यादीस निकालाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई म्हणून धनादेशाचे तीन लाख व ६० हजार दंड द्यावा, असा आदेश दिला आहे़ फिर्यादीच्या वतीने अॅड़ एऩ जी़ पटेल यांनी काम पाहिले़ त्यांना अॅड़ अशोक कावळे यांनी सहकार्य केले़