२०२० मध्ये एक हजार २३४ दुचाकी चोरीस; १९३ दुचाकींचा लागला शोध, २३१ चोरटे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 01:30 AM2021-01-24T01:30:37+5:302021-01-24T01:31:02+5:30
अनेकदा हौसेखातर, कधी प्रेयसीवर प्रभाव पाडण्यासाठी, तर सोनसाखळी चोरण्यासाठी दुचाकींची चोरी केल्याचे या चोरट्यांच्या चौकशीतून पुढे आले आहे
जितेंद्र कालेकर
ठाणे : शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून गेल्या वर्षभरात (२०२०) एक हजार २३४ दुचाकींची चोरी झाली. त्यातील १९३ दुचाकींचा शोध लागला असून २३१ चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. अलिकडेच मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात पोलिसांनीचोरीला गेलेल्या दुचाकी फिर्यादींना परत दिल्या आहेत.
अनेकदा हौसेखातर, कधी प्रेयसीवर प्रभाव पाडण्यासाठी, तर सोनसाखळी चोरण्यासाठी दुचाकींची चोरी केल्याचे या चोरट्यांच्या चौकशीतून पुढे आले आहे. बरेचदा अत्यंत साधे कुलूप असलेली किंवा हॅण्डल लॉक नसलेली दुचाकी हेरली जाते. त्यानंतर संधी साधून ती या चोरट्यांकडून चोरली जाते. शहर किंवा ग्रामीण भागातून चोरलेली दुचाकी थेट दुसऱ्या जिल्ह्यात किंवा परराज्यांतील एखाद्या खेड्यात विकली जाते. दीड दोन लाखांची दुचाकी अवघ्या १० ते ५० हजारांमध्ये विकल्याचे सांगितले जाते.
चोरीसाठी वापर
अनेकदा दुचाकींची एका भागातून चोरी केली जाते नंतर दुसऱ्या भागातील एखाद्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र किंवा चेन जबरीने चोरण्यासाठी किंवा मोबाइल हिसकावण्यासाठी या चोरीच्या दुचाकींचा क्रमांक बदलून वापर केला जातो. या दुचाकीनंतर मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेशात अल्प किमतीत विकल्या जातात, असेही तपासात पुढे आल्याचे पोलीस सांगतात.
३२० दुचाकींचा तपास
२०१९ मध्ये ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांच्या कार्यक्षेत्रातून एक हजार १९२ दुचाकींची चोरी झाली. त्यातील निम्यापेक्षाही कमी म्हणजे ३२० दुचाकींचा शोध घेण्यात यश आले.
दुचाकी चोरल्यानंतर तिची स्वस्तात विक्री होते. अशावेळी खरेदी करणाऱ्यांनीही तिची कागदपत्रे आरटीओ कार्यालयातून पडताळली पाहिजेत. अशा दुचाकींची खेडेगावात १० हजारांतही विक्री होते. दुचाकी मालकांनी चांगले लॉक लावले पाहिजे. गेल्या वर्षभरात २३१ आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे. - लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर