स्विगी, झोमॅटोला एक हजार कोटींची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 08:18 AM2023-11-23T08:18:15+5:302023-11-23T08:18:52+5:30
जीसएटी विभागाचा दणका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही कंपन्यांना केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाने (जीएसटी) प्रत्येकी ५०० कोटी रुपयांची अशी एकूण एक हजार कोटी रुपयांची वसुली नोटीस जारी केली आहे. जुलै २०१७ ते मार्च २०२३ या कालावधीमध्ये या कंपन्यांनी केलेल्या व्यवहारासंदर्भात ही नोटीस जारी केल्याचे समजते.
या दोन्ही कंपन्या खाद्यान्नाचे वितरण करतात व त्याकरिता ग्राहकांकडून वितरण शुल्क आकारतात, त्यामुळे हे शुल्क हा या कंपन्यांच्या महसुलाचाच भाग आहे. त्यामुळे त्यांना जीएसटी भरणे बंधनकारक असल्याचा मुद्दा जीएसटी विभागाने या नोटीसद्वारे उपस्थित केला आहे.
आता या मुद्यावरून या दोन्ही कंपन्या व जीएसटी विभागात जुंपण्याची चिन्हे आहेत. आपण केवळ खाद्यान्नाचे वितरण करतो. त्याद्वारे आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे पैसे आपण वितरण करणाऱ्या मुलांना देतो. तो पैसा आपल्या महसुलाचा भाग नसल्याची भूमिका या कंपन्यांची आहे. अर्थात, या विशिष्ट नोटीसच्या मुद्यावरून दोन्ही कंपन्यांनी अद्याप अधिकृतरित्या आपली कोणतीही भूमिका जारी केलेली नाही.