शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास १ वर्षाचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 08:48 PM2019-02-14T20:48:42+5:302019-02-14T20:50:15+5:30
हा निर्वाळा तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ व सहायक सत्र न्यायाधीश एन. जी. सातपुते यांनी दिला.
वर्धा - शासकीय कामात अडथळा निर्माण करुन सार्वजनिक ठिकाणी शिवागाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास एक वर्षाचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निर्वाळा तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ व सहायक सत्र न्यायाधीश एन. जी. सातपुते यांनी दिला.
शरद रामचंद्र भगत (३६) रा. आष्टा, हल्ली मुक्काम सिंदी (मेघे) असे आरोपीचे नाव आहे. १६ आॅक्टोबर २०१७ रोजी आष्टा येथील अंगणवाडी शाळेत ग्रामपंचायत निवडणूकीचे मतदान सुरु होते. यावेळी या बुथवर पोलीस कर्मचारी सचिन उपाध्याय हे कार्यरत होते. यादरम्यान आरोपी शरद भगत हा मद्यप्राशन करुन बुथवर आला. तेथे त्याने मतदान करताना मोबाईलमध्ये मशीनचे शुटींग घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे केंद्र प्रमुख विजय जांगडे यांनी पोलीस कर्मचारी उपाध्याय यांना बोलावून शरदला बाहेर काढण्यास सांगितले. तेव्हा शरदला बाहेर काढत असताना त्याने उपाध्याय यांच्याशी वाद घालत अश्लिल शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे उपाध्याय यांच्या तक्रारीवरुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाल्यावर सहायक सरकारी अभियोक्ता ए.सी.कोटंबकर यांनी शासनातर्फे सहा साक्षिदार तपासून युक्तिवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी दिगांबर गांजरे यांनी सहकार्य केले. तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ व सहायक सत्र न्यायाधीश सातपुते यांनी आरोपी शरद यास १ वर्ष कारावासाची शिक्षा व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.