तुरुंगात आता मिळणार कांदा-लसूणविरहित जेवण, कारागृह विभागाचे परिपत्रक जारी

By मनीषा म्हात्रे | Published: October 30, 2023 06:18 AM2023-10-30T06:18:01+5:302023-10-30T06:18:31+5:30

कैद्यांच्या मागणीनुसारच निर्णय झाल्याची माहिती

Onion-garlic-free food will now be available in prisons, Prisons Department has issued a circular | तुरुंगात आता मिळणार कांदा-लसूणविरहित जेवण, कारागृह विभागाचे परिपत्रक जारी

तुरुंगात आता मिळणार कांदा-लसूणविरहित जेवण, कारागृह विभागाचे परिपत्रक जारी

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कारागृहातील कैद्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असतानाच, आहारात कांदा व लसणाशिवाय जेवणाचाही समावेश करण्यात आला आहे. रविवारी कारागृह विभागाने याबाबत परिपत्रक जारी करत सर्व कारागृहांत हे आदेश लागू केले.

कारागृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कारागृह विभागात सुरक्षा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात कैद्यांना  येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. तसेच अमिताभ गुप्ता यांना कारागृह भेटीच्या वेळी मुंबई मध्यवर्ती कारागृहातील काही बंद्यांनी धार्मिक व आरोग्याच्या कारणास्तव स्वयंपाक करताना त्यात कांदा व लसूण याचा वापर करू नये अशी विनंती केली. याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली.

ज्या कारागृह संस्थांना कारागृहात बंद्यांचा आहार तयार करताना साधनसुविधा व कारागृह सुरक्षिततेचा विचार करून सहज शक्य होत असेल, तर कांदा व लसूण न वापरता जेवण देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. 
बंद्यांच्या विनंतीनुसार जे बंदी कांदा व लसूण यांचा वापर न करता तसेच कमी तिखट असलेल्या भाजीची मागणी करत आहेत, अशा कैद्यांना आरोग्याच्या दृष्टीने व आहारविषयक परंपरेचा विचार करून वेगळी भाजी बनवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हे नेमक्या कुठल्या कैद्यांसाठी? असाही सूर काहींकडून येत आहे.

सद्य:स्थिती काय?

     राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत. 
     सर्व कारागृहांची क्षमता २४ हजार ७२२ कैद्यांची आहे. 
     सध्या सर्व कारागृहांमध्ये ४१ हजार १९१ कैदी आहेत.
     मुंबई, पुणे, ठाण्यातील कारागृहे सर्वाधिक गर्दीचे आहेत. 
     नुकतेच ३० वर्षांवरील कैद्यांसाठी जाड अंथरूण देण्याचा निर्णय कारागृह विभागाने घेतला.

कैद्यांच्या मागणीनुसार निर्णय

कारागृहातील भेटीदरम्यान अनेक कैद्यांनी कांदा व लसणाशिवाय जेवण देण्याची विनंती केली. त्यानुसार, अन्य जेवणाबरोबर या जेवणाचाही आहारात समावेश करण्यात आला आहे. जेणेकरून भविष्यात कैद्यांच्या आहाराविषयी तक्रारी कमी होतील.
- अमिताभ गुप्ता, अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह 

Web Title: Onion-garlic-free food will now be available in prisons, Prisons Department has issued a circular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.