ऑनलाईन कॅसिनो कम सेक्स रॅकेटवर छापा, 10 हायप्रोफाईल बारबालांसह 70 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 04:54 PM2021-02-01T16:54:56+5:302021-02-01T16:56:35+5:30
Bar Dancer sex racket: अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पटियाला आणि लुधियानाशी संबंधित काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते देखील असल्याचेदेखील सांगितले जात आहे.
पंजाबपोलिसांनी ऑर्गनाईज्ड क्राईम कंट्रोल युनिट (ओकू)ने पंजाबच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हायप्रोफाईल न्यू लाईफस्टाईल, मॅरेज पॅलेसवर छापा टाकला. यामध्ये जुगार (ऑनलाईन कॅसिनो) आणि मोठ्या शरीर विक्रय करणाऱा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. पोलिसांनी पॅलेसचा मालकासह 70 जण आणि 10 तरुणींना आपत्तीजनक परिस्थितीत अटक केली आहे.
याचबरोबर पॅलेसमधून नऊ लाख रुपये रोख, स्नोकर, दारूच्या 40 बॉटल, हुक्का, जुगाराचे साहित्य आणि 10 मोबाईल फोनसह 47 वाहने जप्त केली आहेत. ओकूच्या 30 लोकांच्या टीमने हा छापा मारला. एसपी जसकीरत सिंह यांनी सांगितले की, येथे महागडी दारू दिली जात होती. जुगार खेळला जात होता. 100 मोबाईल जप्त करण्यात आले होते. या अड्ड्यातून मिळणारा पैसा गँगस्टरांना पुरविला जात होता. पंजाबचे सर्वात मोठे रॅकेट होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पटियाला आणि लुधियानाशी संबंधित काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते देखील असल्याचेदेखील सांगितले जात आहे. रॅकेट चालविणारा परमजीत सिंह पम्मीलादेखील अटक करण्यात आली आहे. राजपुराचे डीएसपी गुरुंदर सिंह आणि एसएचओ सिटी गुरप्रताप सिंह हे देखील छापा टाकताना होते. पम्मी हा या भागातील मोठा असामी आहे. राजकारण्यांमध्ये वजन असल्याने तो हा धंदा करत होता.
हे सेक्स रॅकेट आणि काळे धंदे आठवड्यातून तीन दिवस सुरु असायचे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हा धंदा सुरु असायचा. हा पॅलेस एखाद्या क्लबसारखाच होता. तीन दिवसांची फी 25000 रुपये होती. यामध्ये जेवण, दारू, कोल्ड्रींक आदी दिले जात होते. अन्य खर्च वेगळा घेतला जात होता. आरोपींविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
बार डान्सर...
ऑनलाईन कॅसिनोमध्ये पैसे लावायचे आणि त्याच्या आजुबाजुला बार डान्सर नाच करायच्या. यामुळे या पॅलेसमध्ये मोठी गर्दी होत होती. तसेच देहव्यापारही चालू होता. दारुच्या नशेत असलेल्या व्यक्तींना मुली पुरविल्या जात होत्या. आज या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.