ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्याने मॅडमसमोरच पँट काढली, पोलिसांनी अद्दल घडवली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:55 PM2021-06-16T13:55:53+5:302021-06-16T14:36:42+5:30
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण देण्यात येत आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावले जात नसून शिक्षकही घरुनच विद्यादानाचे काम करताना दिसत आहेत
मुंबई - राजस्थानमध्ये विद्यार्थ्यांच्या मर्यादेला शरमेनं खाली मान घालावी लागेल, अशी घटना उघडकीस आली आहे. ऑनलाईन क्लास सुरु असताना 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने चक्क शिक्षिकेसोबत गैरवर्तन केले आहे. विद्यार्थ्याने अश्लील हावभाव करत, शिक्षिकेला ऑनलाईन क्लासमध्येच जाणीवपूर्वक आपली पँट काढली. याप्रकरणी, मुंबईपोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण देण्यात येत आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावले जात नसून शिक्षकही घरुनच विद्यादानाचे काम करताना दिसत आहेत. या ऑनलाईन क्लासमध्ये अनेक मजेशीर घटनाही घडतात. मात्र, राजस्थानमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाइम्स नाऊमध्ये आलेल्या वृत्तानुसार, एका विद्यार्थ्याने ऑनलाईन क्लासदरम्यान आपल्या शिक्षिकेसमोर पँट खाली केल्याची घटना घडली. 15 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत अनेकदा ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.
या प्रकारानंतर पीडित शिक्षिकेने ऑनलाईन क्लास बंद करण्याचे ठरवले होते. पण, अखेर त्यांनी साकीनामा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर, पोलिसांनी घटनेची चौकशी करताना, सर्विलांसद्वारे आरोपी विद्यार्थ्याचा पत्ता शोधला आणि राजस्थानला जाऊन त्यास अटक केली. त्यासाठी, गेल्या महिन्यातही मुंबई पोलिसांचे पथक राजस्थानच्या जैसलमेरला गेले होते.
पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याकडून एक लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. विद्यार्थ्याने मोठ्या हुशारीने लॅपटॉपमध्ये गार्ड बसवला होता. त्यामुळे, आयपी अॅड्रेस ट्रॅक करण्यात अडचण येत होती. विद्यार्थ्याने आपला चेहराही लपवला होता. मात्र, शिक्षिकेने आरोपीच्या बॅकग्राऊंडचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. त्यामुळे, पोलिसांना तपास करताना सोयीचं झालं. आरोपी विद्यार्थ्यास न्यायालयात नेले असता, त्यास बाल सुधारगृहात टाकण्यात आले आहे.