ॲानलाइन फसवणूक: महामारीत दिल्लीकरांना कोट्यवधींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 07:16 AM2021-05-26T07:16:27+5:302021-05-26T07:18:15+5:30
Online fraud: कोरोना महामारीत दिल्लीत लबाड लोकांनी हजारो लोकांची ऑनलाइन फसवणूक करून कोट्यवधी रुपये कमावले आहेत.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : कोरोना महामारीत दिल्लीत लबाड लोकांनी हजारो लोकांची ऑनलाइन फसवणूक करून कोट्यवधी रुपये कमावले आहेत.
लबाडांनी व्हाॅट्सॲप, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर आपले फोन नंबर आणि बनावट वेबसाइट्सच्या लिंक शेअर केल्या. गरजूंनी त्या क्रमांकावर फोन करून वस्तूंसाठी आगाऊ पैसेही भरले. यात ७२ ते ७५ टक्के तक्रारी या ऑक्सिजन सिलिंडरशी संबंधित, तर २२-२३ टक्के तक्रारी रुग्णालयात खाट मिळणे, घरात आयसीयू उपचाराशी संबंधित होत्या. फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर काही तासांत जवळपास २५० बँक खाती सील केली गेली. ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी होत्या. ९०० पेक्षा जास्त मोबाइल क्रमांक बंद केले गेले होते. त्यात सर्वात जास्त ३५९ क्रमांक पश्चिम बंगालचे, तर राहिलेल्या ५४१ मध्ये हरयाणा, राजस्थान, आसाम, कर्नाटक, ओदिशा, उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआरचे आहेत. ४०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले असून, जवळपास १०० आरोपी अटकेत आहेत.
फसवणुकीचे नवे मार्ग...
डीसीपी सायबर क्राइमने लोकांना दिलेल्या इशाऱ्यानुसार घर भाड्याने देऊ इच्छिणारे या लबाडांचे लक्ष्य असते. फसवणूक करणारा प्रॉपर्टी पोर्टलवरून अशा लोकांचे फोन नंबर घेऊन कॉल करतो.
मग भाडे ॲडव्हॉन्स देण्यासाठी घरमालकाला त्याच्या फोनवर एक क्यूआर स्कॅन करायला सांगताे. तो स्कॅन केला की, पैसे लबाडाच्या खात्यात जमा होतात.
ही रक्कम ठराविक कालावधीसाठी खात्यातून कपात होते. जर कोणी आगाऊ भाडे घेण्यासाठी घाई करीत असेल तर त्यापासून सावध राहावे.
माध्यम यूपीआय
फसवणुकीवर लक्ष ठेवणे आणि धोक्याच्या जोखमीची भविष्यवाणी आणि उत्तरे याबाबत जागरूक करणाऱ्या ट्रस्टचेकरच्या अहवालात म्हटले आहे की, फसवणुकीच्या सर्वात जास्त (४१ टक्के) घटना या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून झाल्या आहेत.