ऑनलाइन जुगाराचा नाद जडला भारी; ग्रामसेवकाने कबूल केली ३१ लाखाची चोरी
By युवराज गोमास | Updated: December 5, 2023 17:07 IST2023-12-05T17:07:05+5:302023-12-05T17:07:43+5:30
देव्हाडा ग्रामपंचायतीचे प्रकरण : फौजदारी गुन्हा व आरोपींना अटकची मागणी

ऑनलाइन जुगाराचा नाद जडला भारी; ग्रामसेवकाने कबूल केली ३१ लाखाची चोरी
भंडारा : मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक राकेश वैद्य याने ऑनलाइन जुगार खेळण्याच्या नादात चक्क ३१ लाख रूपयांची चोरी केली. यासाठी सरपंच व खंडविकास अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतील विविध खात्यातून पैशाची उचल केली. बींग फुटताच सोमवारला चौकशी अधिकाऱ्यासमक्ष त्याने दोन वर्षांपासून ऑनलाइन जुगाराच्या नादात गैरप्रकार केल्याची कबूली दिली.
प्रकरणी ५ सदस्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली. गैरप्रकारात सरपंच, उपसरपंच, खंडविकास अधिकारी यांच्या सहभागाचा संशय व्यक्त करीत फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
ग्रामसेवक राकेश वैद्य यांच्याकडे देव्हाडा व खडकी ग्रामपंचायतीचा कारभार आहे. देव्हाडा बुज ग्रामपंचायतीच्या बँके खात्यात साईबाबा मंदिर आवार भिंत बांधकामाचे १९ लाख तसेच घरटॅक्स मिळून २९ लाख रुपये जमा होते. त्यापैकी २८ लाख ४० हजार रुपये सरपंचाची बनावट स्वाक्षरी करून उचल केले. तसेच पाणीपुरवठा फंडातून ५० हजार रुपये, तर अमानत फंडातून ७८ हजार रुपयांची उचल केली. तसेच खंड विकास अधिकारी यांचे संयुक्त खाते असलेल्या दलितवस्ती सुधार फंडातील १ लाख ३ हजार रुपयांपैकी एक १ लाख रुपयांची उचल केली.
राकेश वैद्य यास दोन वर्षांपासून ऑनलाइन जुगार खेळण्याचा नाद जडला होता. जुगार खेळण्यासाठी त्याने सन २०२२ पासून बनावट स्वाक्षरी करून पैशाची उचल करण्याचा गोरखधंदा चालविला होता. ग्रामसेवकाचा हा गैरप्रकार सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांना माहिती न देता सुरू होता. अनेकदा सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी पासबुक मागितले असता घरी आहे, नंतर दाखवतो, असे बोलून वेळ मारून नेत होता. दरम्यान साईबाबा मंदिर आवार भिंतीची रक्कम सामान्य फंडात जमा होती. त्या बांधकामाचे चेक साहित्य पुरवठाधारकाने बँकेत लावला असता तो बाउन्स झाला अन् गैरप्रकार उजेडात आला.
बँकेत ९ लाख रूपये केले जमा
प्रकरणी तक्रार प्राप्त होताच सोमवारला (४ डिसेंबर) पंचायत विस्तार अधिकार बोदेले यांनी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाची चौकशी केली असता ग्रामसेवकाने ऑनलाइन जुगाराच्या नादात गैरप्रकार केल्याचे कबूल केले. त्याचवेळी ९ लाख रूपये बॅकेतील सामान्य फंडात जमा केले. उर्वरीत रक्कम लवकरच जमा करण्याचे लेखी पत्र दिले.
देव्हाडा ग्रामपंचायतमधील गैरप्रकाराप्रकरणी चौकशी केली असता ग्रामसेवकाने परस्पर पैसे काढल्याचे कबूल केले व कबुली पत्र दिले आहे. ग्रामसेवकाने काही रक्कम बँकेत जमा केली आहे. प्रकरणी चौकशी अहवाल वरिष्ठांना सोपविला जाईल.
- भिमगिरी बोदेले, पंचायत विस्तार अधिकारी, मोहाडी.
फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा
सरपंच व प्रभारी सरपंच यांच्या कार्यकाळातील गैरप्रकार असून खंड विकास अधिकारी यांच्या संयुक्त खात्यातूनही रक्कम काढली गेली आहे. गैरप्रकारात अन्य सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही पाच सदस्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे. आरोपी मोकाट असून रेकार्डमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्याची गरज आहे.
- दुर्योधन बोंदरे, ग्रामपंचायत सदस्य, देव्हाडा बुज.