आयडीबीआय बँकेच्या 40 खातेदारांना ऑनलाईन गंडा; डोंबिवलीतील प्रकाराने उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 07:49 PM2021-04-15T19:49:23+5:302021-04-15T19:57:00+5:30
IDBI Bank Fraud Dombivali: फडके रोडवर असलेल्या आयडीबीआय बँकेच्या खात्यातील अनेक खातेदारांचे पैसे गहाळ झाल्याची बातमी पसरताच गुरुवारी बँकेत गर्दी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: डोंबिवली पूर्व परीसरातील आयडीबीआय बँकेच्या शाखेतील 40 खातेदारांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी खातेदारांनी दिलेल्या तक्रारीनूसार रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Online Fraud in Dombivali with IDBI bank Customers.)
फडके रोडवर असलेल्या आयडीबीआय बँकेच्या खात्यातील अनेक खातेदारांचे पैसे गहाळ झाल्याची बातमी पसरताच गुरुवारी बँकेत गर्दी झाली होती. दोन दिवस बँक बंद असल्याने गुरुवारी खातेदारांनी बँकेत धाव घेतली होती. जवळपास 50 खातेदारांच्या खात्यातील पैसे गहाळ झालेत. रामनगर पोलीस ठाण्यात आतापर्यंत 40 लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. फसवणूक झालेल्या खातेदारांमध्ये बँकेच्या कर्मचा-यांचाही समावेश आहे.
कोरोनाच्या संकटात आर्थिक फसवणूक झाल्याने खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बँकेच्या बाजुला एटीएम मशीन आहे. या मशीमध्ये एटीएम वापरल्यानंतर त्याचा डेटा स्क्रिनिंग करून हा चोरीचा प्रकार केला असावा असा प्राथमिक अंदाज असून तपास सुरू आहे असे डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांनी सांगितले.