ऑनलाईन गांजा : ॲमेझॉन संचालकावर गुन्हा दाखल, मध्य प्रदेशात एनडीपीएसनुसार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 09:24 AM2021-11-22T09:24:55+5:302021-11-22T09:25:54+5:30
भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, ॲमेझॉनच्या माध्यमातून गांजाची होम डिलिव्हरी झाल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील एक खरेदीदार होता. पोलिसांनी २१ किलो गांजाही जप्त केला.
भिंड : ऑनलाईन गांजा विक्री केल्याप्रकरणी ॲमेझॉनच्या संचालकांवर मध्य प्रदेशात एनडीपीएसनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, ॲमेझॉनच्या माध्यमातून गांजाची होम डिलिव्हरी झाल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील एक खरेदीदार होता. पोलिसांनी २१ किलो गांजाही जप्त केला. चौकशीत असे समोर आले की, आरोपी सूरज आणि मुकुल जायसवाल यांनी बाबू टेक्स कंपनी स्थापन करून ॲमेझॉनवर विक्रेते म्हणून नोंदणी केली. त्यानंतर या दोघांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून ऑनलाईन गांजा मागवून ग्राहकांना विक्री केला.
या आधारावर पोलिसांनी ॲमेझॉन कंपनीला उत्तर मागविले होते. पण, कंपनीकडून आलेले उत्तर आणि तपासातून समोर आलेल्या बाबी यात तफावत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी ॲमेझॉन कंपनीचे कार्यकारी संचालक यांच्याविरुद्ध एनडीपीएस ॲक्टच्या १९८५ च्या कलम ३८ अंतर्गत गुन्हा दाखल
केला.