ऑनलाइन लग्न जुळले, पण तो आधीच होता विवाहित; आरोपी गजाआड, दीड वर्षाने गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 03:59 AM2020-12-01T03:59:09+5:302020-12-01T03:59:26+5:30
डोंबिवलीतील ३० वर्षांच्या तरुणीने लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर विवाहासाठी नोंदणी केली होती.
डोंबिवली : लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर दोघांचे लग्न जुळले, पण लग्नाच्या तीन दिवस आधी तरुण विवाहित असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे कळताच पीडित तरुणीने विष्णूनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला दाद मिळाली नाही. अखेर, पुरावे गोळा करत ते वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्यावर दीड वर्षाने गुन्हा दाखल झाला असून विजय जगदाळे (रा. नवी मुंबई) याला शुक्रवारी अटक झाली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
डोंबिवलीतील ३० वर्षांच्या तरुणीने लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर विवाहासाठी नोंदणी केली होती. जगदाळे याने तिला पसंत केले. यावर त्याच्या वडिलांनी तरुणीच्या वडिलांशी संपर्क साधून लग्नासाठी मागणी घातली. यानंतर त्यांचा साखरपुडा झाला. २६ मे २०१९ ला लग्न होणार होते. परंतु, तीन दिवस आधी ‘ज्या तरुणाशी तुझे लग्न ठरले आहे, तो माझा पती आहे. तो आधीच विवाहित आहे,’ असा एका महिलेचा संदेश पीडित तरुणीला आला. आपली फसवणूक झाल्याने जगदाळेविरोधात तक्रार देण्यासाठी तरुणीने विष्णूनगर पोलीस ठाणे गाठले. परंतु, सबळ पुराव्यांअभावी तक्रार दाखल करता येत नाही, असे सांगत तिची तक्रार नोंदवण्यास नकार देण्यात आला.
जूनमध्ये तरुणीला जगदाळे व त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केल्याची माहिती मिळाली. हा पुरावा घेऊन तिने ठाणे पोलीस आयुक्तालयात वरिष्ठांची भेट घेतली. त्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी विजय जगदाळे, त्याचे वडील रामचंद्र आणि आई अनिता अशा तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तसेच तिच्या तक्रारीवरून विजयविरोधात लैंगिक अत्याचाराचाही गुन्हा दाखल झाला आहे.
जामीन अर्ज फेटाळताच पोलिसांनी केली अटक
आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण आणि मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केले होते. यात विजयचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याला शुक्रवारी अटक झाली. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी विजयला पुन्हा कल्याण सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
‘कठोर शिक्षा व्हावी’
विजयचे आणखीन एक लग्न झाल्याची माहिती मिळत आहे. त्याने केवळ माझीच नव्हे तर अन्य महिलांचीही फसवणूक केली आहे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अन्य मुलींची फसवणूक होता कामा नये, अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.