मिठाईची ऑनलाइन ऑर्डर पडली महागात; गोल्डन अवरमध्ये तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 11:30 AM2022-10-28T11:30:37+5:302022-10-28T11:31:03+5:30
तक्रारदार पूजा शाह (४९) या अंधेरीच्या वीरा देसाई परिसरात राहतात. त्यांनी २३ ऑक्टोबरला मिठाई घेण्याकरिता मोबाइलमध्ये झोमॅटो अॅपवर तिवारी स्वीट, अंधेरी असे सर्च केले.
मुंबई : अंधेरीतील एका महिलेला दिवाळीसाठी ऑनलाइन मिठाई मागवणे चांगलेच महागात पडले. यात तिला दोन लाख ४० हजार ३१० रुपयांचा गंडा घालण्यात आला. मात्र, याप्रकरणी तिने गोल्डन अवरमध्ये ओशिवरा पोलिसात तक्रार केल्यामुळे संबंधित व्यवहार फ्रीज करण्यात पोलिसांना यश मिळाले.
तक्रारदार पूजा शाह (४९) या अंधेरीच्या वीरा देसाई परिसरात राहतात. त्यांनी २३ ऑक्टोबरला मिठाई घेण्याकरिता मोबाइलमध्ये झोमॅटो अॅपवर तिवारी स्वीट, अंधेरी असे सर्च केले. त्यांनी एक हजाराची मिठाई खरेदी केली; पण ऑनलाइन पेमेंट होत नसल्यामुळे त्यांनी अॅपवरील तिवारी स्वीटच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने तो तिवारी स्वीटमधून बोलत असल्याचे त्यांना सांगितल्यावर शाहने त्याला मिठाईचे पैसे ऑनलाइन ट्रान्सफर होत नसल्याचे सांगितले.
तेव्हा मोबाइलधारकाने बिलाची रक्कम स्विकारण्याकरीता त्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक व त्यांच्या मोबाइलवर प्राप्त झालेला क्रमांक द्यावा लागेल, असे सांगितले. ही माहिती शाह यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला दिली. मात्र, त्यांच्या क्रेडिट कार्डमधून लगेच त्यांच्या एकूण दोन लाख ४० हजार ३१० रुपये वजा झाल्याचा मेसेज त्यांना बँकेमार्फत प्राप्त झाला. त्यावेळी आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शाह यांनी त्वरित ओशिवरा पोलिसात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
पैसे तत्काळ फ्रीज करून टाकले
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे व पोलीस निरीक्षक सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुरकुटे, हवालदार कोंडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सरनोबत यांनी तपास सुरू केला. त्यांनी तत्काळ मिळालेल्या माहितीच्या आधारे पेटीएम, फोन पे, फ्लिपकार्ट पेमेंट अॅपच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधत इ मेलद्वारे पत्रव्यवहार करून तत्काळ शाह यांच्या खात्यातून फसवणूक करत काढलेल्या रकमेपैकी दोन लाख २७ हजार २०५ रुपये फ्रीज़ करवले. ही रक्कम शाह यांना परत करण्यात आल्याचे धनावडे यांनी सांगितले.