वृद्धांना तरुण करू सांगणाऱ्या जोडप्याने ३५ कोटी लुटले पण अकाऊंटमध्ये फक्त ६०० रुपये सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 10:41 AM2024-10-08T10:41:34+5:302024-10-08T10:42:51+5:30
जारो लोकांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींनी हे पैसे कुठे ठेवले आहेत, पैशांचं नेमकं झालं काय?, ते गेले कुठे? याचा पोलीस शोध घेत आहेत.
इस्रायली मशिनच्या मदतीने वृद्धांना तरुण करू असं खोटं सांगणाऱ्या जोडप्याबाबत आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जोडप्याने खोटं सांगून लोकांची तब्बल ३५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी दोन बँकांमध्ये आरोपींची असलेली सहा खाती तपासली. पण या ६ खात्यांमध्ये फक्त ६०० रुपये असल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. हजारो लोकांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींनी हे पैसे कुठे ठेवले आहेत, पैशांचं नेमकं झालं काय?, ते गेले कुठे? याचा पोलीस शोध घेत आहेत.
कानपूरचे रहिवासी असलेले राजीव दुबे आणि त्यांची पत्नी रश्मी दुबे यांच्यावर 'रिव्हायव्हल वर्ल्ड' ही संस्था स्थापन केल्याचा आरोप आहे आणि त्यांनी शहरातील लोकांसमोर दावा केला की, त्यांनी इस्रायलवरून असं एक मशीन आणलं आहे, ज्यावर उपचार करून ६५ वर्षांच्या वृद्ध माणूस २५ वर्षांचा तरुण बनू शकतो. या दाव्यानंतर शहरातील हजारो लोकांनी यासाठी पैसे दिले. मात्र हे मशीन नीट काम करत नसल्याचं आढळून आलं आणि पती-पत्नी दोघेही हजारो लोकांचे सुमारे ३५ कोटी रुपये घेऊन फरार झाले.
ऑक्सिजन थेरपी देऊन करणार तरुण
स्वरूप नगर येथील रहिवासी रेणू सिंह चंदेल यांनी १७ दिवसांपूर्वी राजीव दुबे आणि त्यांची पत्नी रश्मी दुबे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एफआयआरनुसार, इस्त्रायली मशीनद्वारे ऑक्सिजन थेरपी देऊन पाच सेशनमध्ये ६५ वर्षांच्या लोकांना २५ वर्षांचा तरुण बनवण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र दुबे दाम्पत्याचा दावा खोटा ठरला आणि अनेकांचे कोट्यवधी रुपये घेऊन ते फरार झाले.
६ बँक खात्यांमध्ये फक्त ६०० रुपये जमा
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता दुबे दाम्पत्याच्या बँक खात्यांचाही शोध घेण्यात आला. किदवई नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी बहादूर सिंह यांच्यासह पोलीस आयुक्तांनी ६ सदस्यीय एसआयटी स्थापन केली. तपासादरम्यान दुबे दाम्पत्याची स्टेट बँक आणि इंडसइंड बँकेत सहा खाती आढळून आली. पण या ६ खात्यांमध्ये फक्त ६०० रुपये जमा आहेत हे जाणून आश्चर्य वाटलं. अशा परिस्थितीत आरोपींनी आपले पैसेही इतरत्र गुंतवले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
७६ लाखांचे झाले व्यवहार
किदवई नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी बहादुर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या खात्यात अनेक वर्षात एकूण ७६ लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यांनी जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे, मग त्यांनी हे पैसे नेमके कोणत्या खात्यात ट्रान्सफर केले?, आमची टीम याचा तपास करत आहे. दुबे दाम्पत्याचाही शोध सुरू आहे.