बाबो! तीन महिन्यांत घटवलं १० किलो वजन; चोराचा डाएट प्लान ऐकून पोलीस चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 01:00 PM2021-11-18T13:00:28+5:302021-11-18T13:01:10+5:30
चोरीसाठी तीन महिने डाएट; सीसीटीव्ही चुकवत खिडकीतून घुसला; पण एका चुकीमुळे फसला
अहमदाबाद: वजन घटवण्यामागे प्रत्येकाची वेगळी कारणं असतात. बरेचजण फिट राहण्यासाठी, तंदुरुस्ती राखण्यासाठी वजन कमी करतात. काही जण डॉक्टरांच्या सांगण्यावरून वजन कमी करण्याचे प्रयत्न करतात. मात्र अहमदाबादमधल्या मोती सिंह चौहाननं चोरी करण्यासाठी ३ महिन्यांत १० किलो वजन घटवलं. सीसीटीव्ही चुकवत मोतीनं चोरी केली. मात्र तरीही तो पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत त्यानं दिलेली माहिती ऐकून पोलीसही चक्रावले.
चोरी करण्यासाठी मोती सिंह चौहाननं गेल्या तीन महिन्यांपासून कठोर डाएट केलं होतं. वजन घटवण्यासाठी तो दिवसातून एकदाच जेवत होता. दोन वर्षांपूर्वी मोती सिंह बोपाल सोसायटीमधील बसंत बहार सोसायटीत वास्तव्यास असलेल्या मोहित मराडिया यांच्याकडे कामाला होता. तिथे काम करत असताना त्यानं घराची पूर्ण माहिती मिळवली. मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या जातात याची इत्यंभूत माहिती मोतीकडे होती.
घराशेजारी कुठे सीसीटीव्ही आहेत, त्यातून कुठपर्यंतचा भाग दिसतो, याचा अंदाज मोतीनं घेतला. मोहित मराडिया यांच्या घराला इलेक्ट्रॉनिक दरवाजे होते. त्यामुळे मोतीनं व्हेंटिलेशनच्या खिडकीतून आत जाण्याचं ठरवलं. खिडकीतून सहज आत जाता यावं म्हणून त्यानं ३ महिने डाएट करून १० किलो वजन घटवलं.
५ नोव्हेंबरला मोती सिंहनं घरातून ३७ लाख आणि मौल्यवान वस्तू लांबवल्या. चोरी करताना मोतीनं सीसीटीव्ही कॅमेरे शिताफीनं चुकवले. त्यामुळे पोलिसांना त्यांना पकडायला वेळ लागला. पोलिसांनी आसपासच्या भागांत असलेल्या सीसीटीव्हींचं फुटेज गोळा केलं. त्यावेळी एक जण हार्डवेअरच्या दुकानातून खिडकीच्या काचा तोडण्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य घेताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी फोन लोकेशन तपासून पडताळणी केली. त्यात ५ नोव्हेंबरला मोती मोहित यांच्या घरात असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.