केवळ उन्हाळ्यात चाेरी करणाऱ्यास पोलिसांकडून अटक; १३ वर्षापासून करायचा चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 02:23 AM2021-03-23T02:23:56+5:302021-03-23T02:24:20+5:30
रेल्वे पाेलिसांची कारवाई, अवघ्या २४ तासात दादर पोलिसांनी या चोराला मुंबई सेंट्रलमधील एका लॉजमधून ताब्यात घेतले आहे.
मुंबई : मुंबईत एक चोर गेल्या १३ वर्षांपासून फक्त उन्हाळ्याच्या मोसमातच धावत्या रेल्वेमध्येचोरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरट्याचे नाव चकनलाल बाबुलाल सोनकर आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. गेल्या १३ वर्षांपासून मुंबईत फक्त उन्हाळ्याच्या मोसमात चोरी करतो. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दादर लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहाटे प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून एक चोरटा पळून गेला. याबद्दची तक्रार महिला प्रवासी यांनी पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांकडून दादर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असतात. एक व्यक्ती महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून फलाटावर उडी मारून पळून गेला होता. त्यानुसार पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकावरील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच लोहमार्ग पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने या चोरट्यांचा शोध लावून त्याला अटक केली आहे.
मार्च ते मे या तीन महिन्यात चकनलाल मुंबईत येऊन लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये चोरी करत होता. तो नुकताच मुंबईत आला होता. चकनलालवर अगोदरच विविध लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हांची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असून मुंबईतील संपूर्ण लॉज आणि रेस्टॉरंटमध्ये छापे टाकत त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या २४ तासात दादर पोलिसांनी या चोराला मुंबई सेंट्रलमधील एका लॉजमधून ताब्यात घेतले आहे.
अशी करत होता चोरी
उन्हाळ्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करताना प्रवासी खिडक्या उघड्या ठेवून प्रवास करतात. विशेषतः महिला गर्मीमुळे खिडकीत बसून प्रवास करणे पसंत करतात, हीच संधी हेरून हा चोर या महिलांना लक्ष्य करत होता. महिला प्रवाशांचे दागिने खिडकीतून चोरून पसार व्हायचा. त्यानंतर पोलिसांनी पकडू नये म्हणून तो दक्षिण मुंबईतील दररोज वेगवेगळ्या लॉजवर राहत होता. त्यामुळे कोणाला आपला पत्ता लागू नये, हा त्यामागचा उद्देश होता.