बारामती तालुक्यातील रेशनिंगचा काळाबाजार उघड, गुन्हे अन्वेषणचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 08:06 PM2019-07-17T20:06:10+5:302019-07-17T20:10:27+5:30
या छाप्यामध्ये रेशनिगच्या काळाबाजारातील धान्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
बारामती : बारामती गुन्हे अन्वेषण पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार उघडकीस आला आहे. या छाप्यामध्ये रेशनिगच्या काळाबाजारातील धान्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रेशनिंगचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत ६ लाखांचा टेम्पो आणि धान्यासह १२ लाख ७१ हजार ३८० चा माल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन एकास अटक करण्यात आली आहे.इतर तिघे जण फरारी झाले आहेत.
बारामती क्राईम ब्रँच पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस जवान संदीप जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदरची कारवाई करण्यात आली आहे. वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार उघडकीस आला आहे.रेशनिंगचा गहू व तांदूळ रेशन दुकानदाराकडून घेऊन त्याची सरकारी पोती बदलली जात असत.तसेच,ते धान्या दुसऱ्या नवीन पोत्यात भरून त्याची विक्री करण्याचे नियोजन केले जात असे.त्यासाठी काळाबाजारातील धान्य खरेदी करुन त्याचा साठा केला जात असे.काळ्या बाजारातील माल रूममध्ये भरलेला तसेच आयशर टेम्पोमध्ये भरलेला माल मिळून आला आहे.सौरभ सुधीर शहा,सुधीर जवाहरलाल शहा,अक्षय मुथा,जाफर शेख अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. यांपैकी सौरभ यास अटक करण्यात आली आहे.इतर तिघेजण फरारी झाली आहेत.
यावेळी केलेल्या कारवाईत ६ लाखाचा टेम्पो आणि धान्यासह १२ लाख ७१ हजार ३८० चा माल जप्त करण्यात आला आहे.यामध्ये ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा १५ टन गहु, २ लाख ७० हजार रुपये किंमतीचा १३ टन ५९९ किलो तांदुळ, ८ हजार ७५० रुपये किंमतीची २५० किलो साखर, ४७ हजार ६३० रुपये रोख, ६ लाख रुपये किंंमतीचा टेम्पो,११६ पांढरे रंगाचे सरकारी प्लास्टिक पोती, ५२ खाकी रंगाचे सरकारी बारदान (पोती) जप्त करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ ,पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे,पोलीस कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार, रॉकी देवकाते तसेच,
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे ,पोलीस हवालदार बाप्पू पानसरे,पोलीस नाईक विठ्ठल कदम यांनी हि कारवाई केली आहे.