हवेसाठी खिडकी उघडणं बेतलं जीवावर; मुलुंडमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 14:44 IST2019-04-02T14:32:15+5:302019-04-02T14:44:15+5:30
तोल जाऊन खाली कोसळला

हवेसाठी खिडकी उघडणं बेतलं जीवावर; मुलुंडमधील धक्कादायक घटना
मुंबई - रात्री अस्वस्थ वाटले म्हणून मोकळ्या हवेसाठी खिडकी उघडणे तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली. आकाश सावंत (२८) असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे त्याच्या आईवडिलांना धक्का बसला आहे.
मुलुंडच्या गव्हाणपाडा परिसरात आकाश हा आईवडिलांसोबत राहत होता. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतल्यानंतर तो एका बडया हॉटेलात नोकरी करत होता. शनिवारी रात्री कांजूर परिसरात काकांच्या निवृत्ती सोहळा उरकून तो त्याच परिसरातील नवीन इमारतीत १६ व्या मजल्यावर राहण्यास आलेल्या बहिणीच्या घरी थांबला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटले म्हणून त्याने खिडकी उघडली. मात्र, नवीन इमारत असल्याने खिडकीला बेहरे ग्रील नव्हती. त्यातच त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कांजूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.