Operation Chakra-2 : ११ राज्यांमध्ये ७६ ठिकाणी सीबीआयचे छापे, सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 08:34 PM2023-10-19T20:34:31+5:302023-10-19T20:34:58+5:30
भारतातील सायबर संबंधित गुन्ह्यांची पायाभूत सुविधा नष्ट करणे हा या ऑपरेशनचा उद्देश आहे.
नवी दिल्ली : भारतातील वाढत्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांविरोधात सीबीआयने देशव्यापी 'ऑपरेशन चक्र-२' सुरू केले आहे. ऑपरेशन चक्र-२ अंतर्गत सीबीआयने देशातील जवळपास ७६ ठिकाणी छापे टाकले आहेत. या कालावधीत सीबीआयने सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कंपन्यांकडून लॅपटॉप, हार्ड डिस्क आदींसह मोठ्या प्रमाणात डिजिटल गॅझेट जप्त केले आहेत. भारतातील सायबर संबंधित गुन्ह्यांची पायाभूत सुविधा नष्ट करणे हा या ऑपरेशनचा उद्देश आहे. हे ऑपरेशन खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या एजन्सी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
सीबीआय आणि इतर एजन्सींनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरयाणा, केरळ, तामिळनाडू, पंजाब, बिहार, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये ७६ ठिकाणी छापे टाकले आहेत. ऑपरेशन चक्र-२ मुळे ३२ मोबाईल फोन, ४८ लॅपटॉप/हार्ड डिस्क, दोन सर्व्हरच्या प्रतिमा, ३३ सिमकार्ड आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, एजन्सीने आरोपींची अनेक बँक खातीही गोठवली आहेत. सीबीआयने १५ ईमेल खातीही ब्लॉक केली आहेत.
ऑपरेशन चक्र-२ अंतर्गत आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे दोन मोठे घोटाळे उघडकीस आले आहेत. या प्रकरणांमध्ये आरोपी जागतिक आयटी प्रमुख आणि ऑनलाइन तंत्रज्ञान-आधारित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने देशातील लोकांची फसवणूक करत होते. यामध्ये ५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात नऊ बनावट कॉल सेंटर चालवून फसवणूक केली जात होती. आंतरराष्ट्रीय टोळ्यांनी तांत्रिक सहाय्य प्रतिनिधींच्या वेशात परदेशी नागरिकांची शिकार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींनी ऑपरेशन चक्र-२ दरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली ही फसवणूक संपवण्यासाठी एजन्सी आरोपी कंपन्या, शेल कंपन्या आणि ओळख पटलेल्या लोकांच्या गुन्ह्यांची चौकशी करत आहे. याशिवाय, त्यांच्या गुन्ह्यांशी संबंधित डेटा संकलित करून सहाय्यक विभाग आणि मंत्रालयाला कळविण्यात येत आहे.
या संपूर्ण सायबर क्राइम नेटवर्कचा भंडाफोड करण्यासाठी सीबीआय आपल्या आंतरराष्ट्रीय समकक्ष आणि आंतरराष्ट्रीय पोलिसांसोबत काम करत आहे. यामध्ये युनायटेड स्टेट्सचे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI), सायबर गुन्हे संचालनालय आणि इंटरपोलचे आयएफसीसी, युनायटेड किंगडममधील नॅशनल क्राइम एजन्सी (NCA) आणि सिंगापूर पोलिस यांचाही समावेश आहे.