NCBचा मोठा खुलासा, दाऊदचा निकटवर्तीय हाजी अलीच्या सांगण्यावरुन ड्रग्ज भारतात आले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 07:11 PM2024-03-01T19:11:03+5:302024-03-01T19:11:15+5:30
Drugs Seized: एनसीबीने ऑपरेशन 'सागर मंथन'द्वारे 3300 किलो ड्रग्स जप्त केले आहे.
Navy NCB Operation Sagar Manthan: देशात अमली पदार्थाविरोधात काम करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने बुधवारी (28 फेब्रुवारी) ऑपरेशन 'सागर मंथन' अंतर्गत देशातील आतापर्यंतची ड्रग्सची सर्वात मोठी खेप जप्त केली. यापूर्वी एनसीबी केवळ जमिनीवर अंमली पदार्थांवर कारवाई करत असे, मात्र या कारवाईत नौदल आणि गुजरात एटीएसच्या मदतीने समुद्रात 3300 किलो ड्रग्ज जप्त करून एनसीबीने इतिहास रचला.
आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत सुमारे 1300 कोटी रुपये आहे. या प्रकरणी एनसीबीने 5 आरोपींना अटक केली होती, त्यापैकी 1 पाकिस्तानी आणि 4 इराणचे आहेत. आरोपींच्या चौकशीदरम्यान पाकिस्तानी कट उघडकीस आला. ड्रग्जच्या एवढ्या मोठ्या खेपेमागे पाकिस्तानचा सर्वात मोठा ड्रग स्मगलर आणि दाऊद इब्राहिमचा जवळचा हाजी सलीम याचा हात असल्याचेही तपासात समोर आले आहे. एनसीबी प्रकरणात पाकिस्तानचे नाव येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एनसीबीने केलेल्या ऑपरेशन समुद्रगुप्तमध्ये दाऊदच्या जवळच्या हाजी सलीमचे नाव पुढे आले होते.
'दाऊदच्या जवळच्या व्यक्तीने कट रचला होता'
एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, ''चौकशीदरम्यान पाकिस्तानी नागरिक मोहम्मद चारीझाईने सांगितले की, त्याने हाजी मोहम्मदच्या सांगण्यावरून ड्रग्जची इतकी मोठी खेप भारतात आणली होती. दाऊदचा जवळचा सहकारी हाजी सलीम प्रत्येक वेळी नवीन नाव वापरतो. यावेळी त्याने स्वत:चे नाव हाजी मोहम्मद असे ठेवले. हे पाच जण इराणच्या चाबहार बंदरातून एकत्र निघाले होते. त्या बंदरावरून ते थेट भारताच्या दिशेने आले.''
#WATCH | Deputy Director General, NCB, Gyaneshwar Singh says, "NCB had recovered 3.3-ton drugs & arrested five accused. A joint interrogation of the five accused was done with ATS. Four of them are originally from Iran & one of them is originally from Pakistan. These five people… pic.twitter.com/t0tjryDhcN
— ANI (@ANI) March 1, 2024
'एनसीबी प्रत्येक वेळी पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडेल'
ज्ञानेश्वर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ''पाकिस्तान भारताविरुद्ध सातत्याने मोठे षड्यंत्र रचत आहे. मात्र एनसीबी प्रत्येक वेळी पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडत आहे. भारत भौगोलिकदृष्ट्या डेथ क्रेसेंट आणि डेथ ट्रँगल दरम्यान स्थित आहे. यामुळे, हा एक व्यवहार बिंदू आहे आणि इथला खपही मोठा आहे. जो काही पैसा येतो, तो सर्व पैसा गुन्हेगारी नेटवर्कमध्ये वापरला जातो. यातून आपल्याला कमकुवत आणि पोकळ करण्याचा कट आहे, ज्याला आम्ही योग्य उत्तर देत आहोत.''
'हवालाद्वारे पैसे हस्तांतरित केले'
"एवढ्या मोठ्या ड्रग्जच्या खेपेचे पैसे हवालाच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. एवढेच नाही तर एनसीबीने 1 सॅटेलाइट फोन आणि 4 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या संपूर्ण नेटवर्कला उखडून काढता यावे यासाठी फॉरेन्सिकली तपासणीही केली जात आहे. एनसीबी आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या व्यक्तीने भारतात अमली पदार्थांची एवढी मोठी खेप मिळवली, ती व्यक्ती कोण आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कोणाकडे पोहोचणार होते. लवकरच याचा खुलासा होईल," असंही ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.