पेटलेल्या चितेतून मुलीचा मृतदेह बाहेर ओढला, अन्…; बलात्कार पीडितेच्या आईनं सांगितली थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 08:17 AM2021-08-04T08:17:19+5:302021-08-04T08:18:48+5:30
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पुजाऱ्यासह चौघांना अटक केली आहे.
नवी दिल्ली – राजधानीत ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. विरोधी पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केले आहे. तर आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत तात्काळ या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे.
पुजाऱ्याने सांगितले, करंट लागल्याने मृत्यू
पीडिताच्या आईवडिलांनी आरोप केलाय की, माझ्या मुलीसोबत बलात्कार झाला आहे आणि एका पुजाऱ्याने खोटं बोलून तिचे अंत्यसंस्कार केले आहे. मुलीचा करंट लागून मृत्यू झाल्याचं त्याने सांगितले. मुलीच्या आईवडिलांसह अनेक लोकांनी मंगळवारी या प्रकरणी घटनास्थळी धरणं आंदोलन केले. दोषींना मृत्यूदंड देण्याची मागणी केली. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी देखील आंदोलन केले आहे.
माझी मुलगी स्मशानात पाणी आणण्यासाठी गेली होती...
मुलीच्या आईनं म्हटलंय की, घटनेच्या वेळी माझी मुलगी स्मशानात पाणी आणण्यासाठी गेली होती. पुजाऱ्याने मला काही क्षणांसाठी मुलीचा मृतदेह दाखवला. तिचे होठ निळे पडले होते. पुजाऱ्याने आमच्या मर्जीशिवाय मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मुलीला करंट लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं पुजारी खोटं बोलत आहे. पुजाऱ्यानेच माझ्या मुलीवर बलात्कार केला असा आरोपही त्यांना लावला आहे.
...अन् पेटलेली चिता विझवली
आमच्या समाजाच्या काही माणसांनी पेटलेली चिता विझवली आणि माझ्या मुलीच्या पायाला पकडून तिचा मृतदेह बाहेर ओढला. आम्हाला न्याय हवा. दोषींना शिक्षा द्या. मुलीच्या वडिलांनी आरोप केलाय की, एका व्यक्तीने त्यांना बेदम मारलं आणि पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारेन असं धमकावलं. घटनेच्या वेळी मी बाजारात होतो. मला संध्याकाळी ७.३० च्या सुमारास समजलं. एका व्यक्तीने मला २० हजार रुपये देण्याचं आमिष दाखवलं परंतु मी ते स्वीकारलं नाही. पुजाऱ्याने त्या व्यक्तीला घटनेबद्दल सांगितलं असावं असं पीडित मुलीच्या वडिलांनी संशय व्यक्त केला.
आतापर्यंत चौघांना अटक
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पुजाऱ्यासह चौघांना अटक केली आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, कायद्याखाली दोषींवर कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.