संत्रा तोड अल्पवयीन मजूर ठरली ‘कुमारी माता’, बलात्कारातून मुलीला जन्म; आरोपीला अटक
By प्रदीप भाकरे | Published: January 6, 2023 06:15 PM2023-01-06T18:15:13+5:302023-01-06T18:15:56+5:30
आरोपी तौसिफ शहा याने तिला लग्नाचे आमिष दिले. आपण लग्न करणारच आहोत, अशा प्रलोभनाला ती भुलली अन्...
अमरावती - संत्रा तोड मजूर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिचे सर्वस्व लुटण्यात आले. त्यातून तिला गर्भधारणा होऊन तिने मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघड झाली. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी ५ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास आरोपी तौसिफ शहा आसिफ शहा (१९, रा. ब्राम्हणवाडा थडी) याच्याविरूध्द बलात्कार, पोक्सो व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, पिडित १६ वर्षीय मुलगी ही संत्रातोड मजूर आहे. तर आरोपी देखील मजूर आहे. मागील वर्षी सुरूवातीला त्या दोघांमध्ये ओळख झाली. परस्परांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. अधूनमधून त्यांच्यात भेटी देखील होऊ लागल्या. अशातच आरोपी तौसिफ शहा याने तिला लग्नाचे आमिष दिले. आपण लग्न करणारच आहोत, अशा प्रलोभनाला ती भुलली. काही भेटीदरम्यान आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २० मार्च २०२२ पुर्वी हा प्रकार घडला. दरम्यान त्यातून ती गर्भवती राहिली.
असे फुटले बिंग -
त्या षोडशीने बलात्कार व गर्भधारणेची बाब कुटुंबियांकडून दडवून ठेवली. दरम्यान ४ जानेवारी रोजी त्या अल्पवयीन मुलीची घरातच नैसर्गिक प्रसुती झाली. तिने स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. प्रसुतीनंतर तिला सलाईनची गरज भासल्याने गावातीलच एका डॉक्टराकडे नेण्यात आले. दरम्यान, ती माहिती अंगणवाडी सेविकेने चाईल्डलाईनला दिली. चाईल्डलाईनने संबंधित गाव गाठून पिडिताची भेट घेतली. तिच्याकडून संपुर्ण आपबिती जाणून घेतली. त्याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. पिडिताच्या जन्मतारखेचा दस्तावेज तपासण्यात आला. अखेर त्याबाबत पिडिताच्या आईने तक्रार नोंदविली. सध्या पिडिता व तिचे नवजात अर्भक फिर्यादी महिलेकडे आहे.
चाईल्डलाईनने आम्हाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून वस्तुस्थिती जाणून घेतली. गुरूवारी रात्री आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली. त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
- पंकज दाभाडे, ठाणेदार, ब्राम्हणवाडा थडी