श्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 06:56 AM2020-09-24T06:56:09+5:302020-09-24T06:56:29+5:30
जया साहाच्या कबुलीने बॉलीवूडचा चेहरा उघड; नैराश्यामुळे अनेक जण ड्रग्जच्या आहारी
जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूडमधील तारे-तारकांना चित्रपट, जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजाविणाऱ्या जया साहाने गरजेनुसार त्यांना ड्रग्ज पुरविल्याची धक्कादायक बाब तिच्या चौकशीतून समोर आली. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सुशांतसिंह राजपूत यांना सीबीडी आॅइल पुरविल्याचीही कबुली तिने दिल्याचे समजते.
जयाकडे एनसीबी सलग गेले तीन दिवस सखोल चौकशी करीत आहे. क्वान कंपनीच्या दहा भागीदारांपैकी एक असलेल्या जयाचे मोबाइलवरील व्हॉट्सअॅप चॅट तपासून तिच्याकडे ड्रग्जबाबत चौकशी सुरू आहे. तिने श्रद्धा कपूरसाठी भारतात प्रतिबंधित ‘सीबीडी आॅइल’ची आॅनलाइन तजवीज केल्याची कबुली दिली. याशिवाय रिया चक्रवर्ती, सुशांत, चित्रपट निर्माता मधू मांटेना, स्वत:साठीही सीबीडी आॅइल मागविले होते. मात्र आतापर्यंत कोणत्याही ड्रज तस्कराशी संपर्क केला नसल्याचे तिने म्हटले. नैराश्यात असल्याने अनेक कलाकार ड्रग्जच्या आहारी गेल्याचे तिने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एनसीबीकडून चित्रपट निर्माता मधू मांटेनासह तिघांकडे कसून चौकशी
एनसीबीने जयाकडे बुधवारी सहा तास चौकशी केली. तिच्यासह मधू मांटेना, ‘क्वान’ टॅेलेन्ट व्यवस्थापन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चितगोपेकर यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत विचारणा करण्यात आली.
सुशांत शेवटच्या भेटीत
विक्षिप्तपणे वागला
कुमार मंगल यांच्या आगामी चित्रपटासाठी ५ जून रोजी आपली सुशांतशी शेवटची भेट झाली. त्याला चित्रपटाची कथा आवडली होती. त्यासाठी त्याला सहा कोटींची आॅफर होती. मात्र त्याने १२ कोटी रुपये मागितले होते, अशी माहिती जयाने दिली. त्या भेटीवेळी सुशांत अतिशय विक्षिप्तपणे वागला. मध्येच उठून चालायचा, बेडरूममध्ये जायचा, असेही तिने जबाबात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
चित्रपट, जाहिरातींसाठी केले होते साईन
‘ड्राईव्ह’, ‘सोनचिरीया’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ या चित्रपटांसाठी जयाने सुशांतला साईन केले होते. ‘ड्राईव्ह’साठी त्याला सव्वादोन कोटी रुपये मिळाले होते. ‘दिल बेचारा’साठी साडेतीन कोटी, ‘छिछोरे’, ‘सोनचिरीया’साठी प्रत्येकी पाच कोटी मिळाले होते. जयाने सुशांतला २०१६ ते २०१९ दरम्यान अनेक जाहिराती तसेच कार्यक्रमांसाठीही साईन केले होते.
दोन टीव्ही कलाकारांच्या घरांची झडती
ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने एनसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री दोन टीव्ही कलाकारांच्या घराची झडती घेतल्याचे समजते. अॅबीगेल, सनम अशी त्यांची नावे आहेत. ड्रग्ज तस्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराची पाहणी केली. मात्र फारसा काही मिळाले नाही.