ऑर्डर, ऑर्डर... कोर्टात खोकलेला आरोपी निघाला कोरोनो पॉझिटिव्ह; १७ पोलीस क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 03:11 PM2020-04-10T15:11:58+5:302020-04-10T16:09:16+5:30
लोकल फोकल पॉईंट पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस अधिकारी यांचा देखील या १७ पोलिसांमध्ये सहभाग आहे.
लुधियाना - पंजाबमध्ये अटक करण्यात आलेल्या वाहन चोराला करोनाची लागण झाली असल्याचं धक्कादायक माहिती कोर्टात जजसमोर खोकल्यानंतर केलेल्या डॉक्टर तपासात उघडकीस आली. गुरुवारी आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाल्यानंतर १७ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लोकल फोकल पॉईंट पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस अधिकारी यांचा देखील या १७ पोलिसांमध्ये सहभाग आहे.
लुधियानामध्ये या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांप्रमाणे जज आणिन्यायालयातील कर्मचारी यांनाही स्वविलगीकरणात राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. वाहनांची चोरी करणाऱ्या सौरव सेहगल (२५) अटक करुन ५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले. जीवन नगर पोलीस ठाण्याच्या जेलमध्ये त्याला एका दिवसासाठी ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी दोन स्थानिकांच्या मदतीने या चोराला बेड्या ठोकल्या. चोराच्या कुटुंबातील ११ सदस्यांनाही गणेश नगर येथील परिसरात क्वारंटाइन करण्यात आले आहे.
६ एप्रिलला आरोपी सौरवला कोर्टात हजर केले त्यावेळी जज यांना त्याला ताप आणि खोकला असल्याचं दिसून आले. नंतर त्यांनी पोलिसांना त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी सौरव सेहगल आणि त्याच्या साथीदाराला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याआधी वैद्यकीय तपासणी करुन घेतली. यावेळी सौरव कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झालं. यानंतर १७ पोलिसांसह जज आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांना स्वविलगीकरणात राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
वैद्यकीय तपासणीस नेताना दुसरा चोर झाला फरार
वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेत असताना सौरवचा साथीदार नवज्योत सिंह याने पळ काढला. सोनसाखळी चोरी प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव आजारी वाटत होता, मात्र नवज्योतची प्रकृती ठणठणीत होती. मात्र, सौरवच्या संपर्कात आल्याने त्यालाही करोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याने पोलीस त्याला शोधत आहेत.